शिक्षक पुरस्कारावरून जळगाव जि़प. सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:18 PM2019-09-08T12:18:31+5:302019-09-08T12:18:42+5:30
पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईल। सभापती, पालकमंत्र्यांना वेळ नसल्याच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद
जळगाव : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त टळल्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला़ पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांमधीलच मतभेद समोर आले़ मर्जीतल्या शिक्षकांना पुरस्कार देण्याची धडपड असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ, असे स्पष्टीकरण सभापती पोपट भोळे यांनी दिले़ यासह ग्रामपंचायत विभागाची वसुली व ग्रामसेवकांचा पदभार या मुद्द्यांवरूनही शनिवारची सभा चांगलीच वादळी झाली़
शिक्षक पुरस्काराच्या यादीत घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत मोठा गदारोळ झाला़ त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पुरस्कार वितरण पुढे ढकलल्याचे शिक्षण सभापतींनी सांगितल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीर्ची शेवटची सर्वसाधा़रण सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली.
शिवतीर्थ मैदानावर मद्याच्या बाटल्या व मांसाहाराचे तुकडे खुलेआम आढळतात, असे सांगत सदस्य नानाभाऊ महाजन यांनी यासंदर्भातील फोटो सभागृहात दाखवित ही लाजीरवाणी बाब असल्याचा मुद्दा मांडला़ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे, असेही ते म्हणाले़
शिक्षक पुरस्कार सोहळ्यावरून सर्व सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली़ सदस्य रवींद्र पाटील यांनी हा मुद्दा मांडत मर्जीतल्या शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी धडपड असल्याचा आरोपही केला व यादी जाहीर करावी, अन्यथा आंदोलनाचा असा इशारा दिला़
ग्रामसेवकांकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली होत नसून कारवाई टाळण्यासाठी केवळ खोटे आकडेवारी दाखविली जाते, अशा खोट्या आकड्यांमुळे व वसुली होत नसल्यामुळे एक दिवस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांना वाहनांमध्ये डिझेल मिळणार नाही व बसायला जागाही मिळणार नाही, अशी परिस्थिती येईल, असे सांगत सदस्य नानाभाऊ महाजन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गोपाळ चौधरी, मधू काटे, रावसाहेब पाटील, शशिकांत साळूंखे यांनी भूमिका मांडल्या़ ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ ए़ बोटे यांना धारेवर धरले़ ६६ कोटींपैकी १९ कोटी वसुली बाकी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली़ ग्रामसेवकांना वाचविण्यासाठी ७० टक्क्यांच्यावरच वसुली दाखविली जात असल्याचे उपाध्यक्ष म्हणाले़
चर्चा करूनच विषयाला मंजुरी
पाचोरा, अमळनेर एरंडोल तालुक्यांमध्ये जि.प. मालकीच्या इमारती बीओटी तत्त्वावर देण्याच्या अहवालास शासनास पाठविण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता़ मात्र, आम्हाला कुठलीही कल्पना न देता चर्चा न करता परस्पर असा विषय ठेवला कसा? कुठलाही ठेकेदार येईल व काहीही प्रस्ताव ठेवेल हे चालणार नाही, अशी भूमिका मांडत चर्चा करूनच या विषयाला मंजुरी दिली जाईल, अशी भूमिका उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी मांडत अधिकाºयांना धारेवर धरले़ अमळनेरच्या या विषयाला सदस्या जयश्री पाटील यांनीही विरोध दर्शविला़
ग्रामसेवकांचा भार मुख्याध्यापकांवर
ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारल्यामुळे कार्यभार कोणाकडे सोपविणार या सदस्यांच्या प्रश्नावर विस्तार अधिकारी, अन्य शासकीय कर्मचारी किंवा मुख्याध्यापकांकडेही ग्रामसेवकांचा पदभार दिला जाऊ शकतो, अशी शक्यता अधिकारी बोटे यांनी व्यक्त करून पदभार सोपविण्यासंदर्भात बीडीओंना सभेतच पत्र दिले़ ग्रामसेवकांनी दिलेल्या चाब्या स्वीकारण्याचे अधिकार बीडीओंना आहेत का? या उपाध्यक्षांच्या प्रश्नावरून अधिकारी बोटे गोंधळे, या मुद्दयावर हशा पिकला होता़ दरम्यान, ग्रामसेवकांच्या चाव्या स्वीकारणाºया विस्तार अधिकाºयांवर कारवाईचे आदेश देण्यात आले़