जळगाव जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पगार थांबविले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:29 AM2019-11-12T11:29:52+5:302019-11-12T11:30:25+5:30
योजना प्रलंबित असल्याने तालुकास्तरावर कारवाई झाल्याची माहिती
जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील अभियंते व व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ या योजना पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पगार होणार नाहीत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्याचे समजते़ अधिकाºयांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
१७८ योजना रखडलेल्या
गेल्या पाच वर्षांपासून भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल अंतर्गत असलेल्या २८० योजना रखडल्या होत्या़ स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समित्यांकडून झालेला विलंब, कामांत होणारी दिरंगाई यामुळे या योजना रखडल्या होत्या़ त्यापैकी १०२ योजनांची कामे गेल्या चार ते पाच महिन्यात मार्गी लागल्याची माहिती आहे़ मात्र, अद्यापही १७८ योजना प्रलंबित आहेत़ त्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलल्याचे समजते़ शिवाय भारत निर्माण ही योजना बंद करून दुसरी योजना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली असल्याने या योजनेतील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे, अन्यथा नव्या योजनेतून योजना मिळणार नाहीत, त्यामुळे तत्काळ या योजना मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनांचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश होते़ ते पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठा समित्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या़