जळगाव जि़ प़ मालकीचे १८ गाळे खाली करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:37 PM2019-09-24T12:37:03+5:302019-09-24T12:37:30+5:30
लवकरच कायदेशीर बाबींची पूर्तता करून कारवाई
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीची जळगाव शहरातील मुदत संपलेली १८ गाळे न्यायालयाच्या निर्णयानंतर खाली करण्याच्या हालचाली जि़ प़ प्रशासनोन सुरू केल्या आहेत़ या प्रकरणातील वकील बदलण्यात आले असून नवीन वकीलांचे मत घेऊन लवकरच गाळेधारकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बांधकामचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी सांगितले़
जळगाव शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जवळ जिल्हा परिषदेच्या मालकीचे एकूण वीस गाळे होते़ या गाळ्यांची मुदत संपूण दहा वर्षांच्या वर कालावधी उलटूनही ती खाली करण्यात आलेली नाही़ यापैकी दोन गाळे खाली करण्यात आली होती़ दरम्यान, शासनाच्या विरोधात गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते़ ते न्यायालयाने दीड महिन्यापूर्वी निकाली काढत शासनाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून मग गाळे खाली करावे, असे सूचित केले आहे़ दरम्यान, आधीच्या वकीलांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे त्यांना बदलविण्यासाठी विभागातूनच निर्णय झाला होता, त्यानुसार सीईओंच्या आदेशानुसार वकील बदलण्यात आल्याची माहिती येवले यांनी दिली़ आधी अॅड़ अनिल नेमाडे यांनी जिल्हा परिषदेची बाजू मांडली होती़ नवीन वकीलांच्या सल्ल्यांनुसार आता पुढील कारवाई करू, आचारसंहिता संपण्याआधीच कारवाई केल्यास सोयीचे राहिल, असा सूरही उमटला असून लवकरच याबाबत कारवाई केली जाईल, असेही येवले यांनी सांगितले आहे़ कोट्यवधींची थकबाकी असल्याने शासनाचे नुकसान होत असून हा विषय वांरवार विविध बैठकांमध्येही समोर आला होता़ दरम्यान, गेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या मालमत्ता व त्या ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करावा अशी मागणीही सदस्यांनी केली होती़ मात्र जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या अशा मालमत्ता किती याची माहिती ग्रामपंचायत विभागाकडे नव्हती, याबाबत आढावा घेण्याचे आदेशही उपाध्यक्षांनी दिले होते़ या गाळ्यांमधून जिल्हा परिषदेला मोठे उत्पन्न मिळणार असल्याने याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होती़