जळगावाता धनत्रयोदशीला ‘सुवर्णवेध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:25 PM2018-11-06T12:25:35+5:302018-11-06T12:31:51+5:30
सुवर्ण बाजारात उसळली गर्दी
जळगाव : धनत्रयोदशीला जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर प्रचंड गर्दी होती. सोन्याचा भाव ३२ हजार २०० पर्यंत असतानाही दुकानांमध्ये पाय ठेवण्यासही जागा नव्हती. दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली.
यंदा जिल्ह्यात दुष्काळीस्थिती असल्याने सोने-चांदी खरेदीस फारशी गर्दी होणार नाही, असे संकेत मिळत होते, मात्र ग्राहकांनी धनत्रयोदशीला महत्त्व दिल्याने जाणकारांचे अंदाज फोल ठरविले.
सुवर्णनगरी म्हणून जळगावची देशभरात ख्याती आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीचा चांगला योग असल्याने या दिवशी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जात असते. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सोने खरेदीसाठी शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली होती.
धन्वंतरीचे पारंपरिक पद्धतीने पूजन
धनत्रयोदशीला धन्वंतरीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.
त्यानंतर घरातील धनाची देखील यावेळी पूजा करुन आरोग्यासह सुखसमृद्धी नांदावी. यासाठी प्रार्थना करण्यात आली.
आज नरक चतुर्दशी
आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरकचतुर्दशी. पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेलाचे मर्दन लाऊन स्नान केले जाते, त्यास अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे.
धनत्रयोदशीचा योग साधत ग्राहकांनी सोने खरेदीला प्रचंड प्रतिसाद दिला. दुष्काळी परिस्थिती असतानाही खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती.
-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, बाफना ज्वेलर्स.