जळगावकरांना तर सुविधा देत येत नाही, आम्हाला काय देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:14+5:302021-03-06T04:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून मनपा सत्ताधाऱ्यांनी केलेला निर्णयाला विरोध होत आहे. जळगावकरांना सुविधा मिळत नसून, त्यापासून नागरिक वंचित आहेत. अशा परिरस्थितीत हद्दवाढ झाल्यानंतर आमच्या गावाला सुविधा मिळणे कठीण होवून जाईल. त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचा विकास करून घ्यावा, आमच्या गावाचा हद्दवाढीबाबत मनपाने विचार करू नये. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास आम्ही करून घेवू असे मत मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत हद्दवाढीचा विरोध केला आहे.
मण्यारखेडा हे गाव लहानसे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही तक्रारी असल्या तरी त्या गावातल्या गावातच सोडविल्या जातात. आमच्या गावाचा समावेश जर मनपा हद्दीत करण्यात आला. तर लहानातल्या लहान समस्येसाठी देखील नागरिकांना जळगाव शहरात येवून महानगरपालिकेत जावे लागेल. यासह ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाकडून गावाचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी मिळत आहे. महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना विकासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा, अन्यथा ग्रामस्थांना मनपा विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
कोट...
मण्यारखेडा येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कारभारापासून कोणत्याही तक्रारी नाहीत. गावाचा विकास चांगल्याप्रकारे होत असून, नागरिकांना मुलभुत सुविधा देखील मिळत आहेत. त्यामुळे मनपा हद्दवाढीला आमचा विरोध आहे.
-शालूबाई पाटील, सरपंच, मण्यारखेडा
जळगावमध्ये धुळीची मोठ्या समस्या अनेक वर्षांपासून आहे. ही समस्या अजूनही मनपाला सोडविता आली नाही. अनेक भागात गटारी नाहीत, रस्ते नाहीत. अशा परिस्थितीत महापालिका आमच्या गावात काय विकास करेल ? त्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच सक्षम आहे.
-भगवान पाटील, उपसरपंच, मण्यारखेडा
आमचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे गाव मनपाच्या हद्दीत जावू देणार नाही. याविरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव केला जाणार आहे.
-संदीप अहिरे, ग्रा.पं.सदस्य
मनपा प्रशासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शहरात सुविधा मिळत नाही. आमच्या गावात सर्वसामान्य नागरिकांना दररोज पाणी मिळत आहे. गटारी चांगल्या आहेत, रस्ते आहेत. अशा परिस्थितीत मनपात जावून गावाचा विकास थांबून जाईल.
-नामदेव पाटील, ग्रा.पं,सदस्य