जळगावकरांची अनोखी एकजूट, कडकडीत बंद कोरोनाला हरविण्याचा निश्चय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:38+5:302021-03-13T04:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शुक्रवार, १२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शुक्रवार, १२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कडकडीत बंद पाळत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आपली एकजूट दाखवून दिली. ‘जनता कर्फ्यू’ला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळपासूनच सामसूम होते. स्त्यावर केवळ पोलीस, बँकांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, मेडिकलवर काम करणारी मंडळी व औषधी घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्ती येत-जात असल्याचे चित्र होते. एकूणच बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्त्यांवर काही प्रमाणात वाहने ये-जा करीत होते. बाजारपेठ बंद असल्याने पहिल्याच दिवशी जवळपास १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. कोरोनाला हरविण्यासाठी जळगावकरांनी संयम राखत घरी थांबले व संकल्पपूर्तीने कर्फ्यूला प्रतिसाद दिला.
गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहे. यात ६ मार्चपर्यंत लावण्यात आलेले निर्बंध १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आले. मात्र या दरम्यानही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने अखेर जळगाव महापालिका क्षेत्रात १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला. या तीन दिवसीय जनता कर्फ्यूमध्ये पहिल्या दिवशी सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह नागरिकांनी स्वत: सहभागी होत कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्धार केला व सर्वांनी घरात राहणे पसंत केले. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सामसूम होते. त्याचबरोबर बस स्थानक, रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.
बाजारपेठ कडकडीत बंद
व्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठही यात कडकडीत बंद राहिली. प्रशासनाने बंदचे आवाहन केल्यानुसार विविध व्यापारी संघटनांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व तो प्रत्यक्षात उतरवूनदेखील दाखविला. तसेच किराणा दुकाने, हॉटेल व इतर सर्व आस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. त्यामुळे दररोज मोठी वर्दळ असणारे शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाण पूर्णपणे बंद होती.
उलाढाल थांबली
जळगावातील बाजारपेठेतून जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ या भागातही मोठ्या प्रमाणात माल नेला जातो. त्यामुळे जळगावात दररोज विविध मालाच्या खरेदीसाठी या भागातून वाहने येतात. शुक्रवारी ही वाहनेदेखील आले नाही. तसेच हा व्यवहार थांबला. या सोबतच सुवर्ण व्यवसाय, कापड व्यवसायही मोठा असल्याने ही दुकाने बंद राहून शहरातील जवळपास १०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सलग दुसऱ्या मार्चमध्ये बंद
गेल्या वर्षी मार्च महिन्यात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी जनता कर्फ्यूनंतर आता पुन्हा यंदाच्या मार्च महिन्यातही जळगावात जनता कर्फ्यू जाहीर झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी लग्नसराई, धान्य खरेदीच्या काळात जळगावात कडकडीत बंद पहायला मिळाला. तसे पाहता अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह सर्वांच्याच आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरू चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक हे सर्व सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्त्यांवर वर्दळ कमीच होती. त्यामुळे शहरात सर्वत्र शांतता होती. सर्वच जणांनी घरात कुटुंबासोबत गप्पांमध्ये रमले होते.
भाजी बाजारातही शुकशुकाट
जीवनावश्यक गोष्टी म्हणून लॉकडाऊन काळात किराणा दुकान, भाजीपाला विक्री सुरू ठेवले होते. मात्र या वेळी जनता कर्फ्यूमध्ये केवळ औषध दुकान, दूध केंद्रच सुरू ठेवण्यात आल्याने किराणा दुकानांसह भाजीपाला बाजारातही शुकशुकाट पहायला मिळाला.
हॉटेल-लॉजही ओस
जनता कर्फ्यूदरम्यान हॉटेलवरून केवळ पार्सलची परवानगी असल्याने शहरातील हॉटेल-लॉजही ओस पडल्याचे दिसून आले. घराबाहेर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळण्याने तसेच जळगावात जनता कर्फ्यू अगोदरच जाहीर झाल्याने बाहेर गावाहून येणारी मंडळीही न आल्याने हॉटेलमध्ये ग्राहकी नसल्याचे चित्र होते. तेथून केवळ पार्सल दिले जात होते, मात्र तेही अत्यंत तुरळक प्रमाणात होते.
उद्योजकांकडून दक्षता
जनता कर्फ्यूदरम्यान औद्योगिक वसाहत सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी उद्योजकांनी दक्षता म्हणून बाहेर गावाहून येणाऱ्या कामगार, मजूर यांना शक्यतो प्रवास टाळण्याचे सांगितले होते. तसेच जनता कर्फ्यूमध्ये येण्या-जाण्यास अडचण येऊ नये म्हणून कामगार, मजुरांना ओळखपत्र असण्याविषयी कात्री करून घेतली होती. जनता कर्फ्यूदरम्यान एक शनिवार येत असल्याने त्या दिवशी औद्योगिक वसाहत बंदच राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार व रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान बाहेर गावच्या कामगार, मजुरांना सूचना देण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले.