जळगावकर नागरिकांनी घडविले एकोप्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:00 PM2019-11-10T12:00:31+5:302019-11-10T12:01:06+5:30
अयोध्या निकाल । ठिकठिकाणी होता पोलीस बंदोबस्त, बाजारपेठेत खरेदीचा उत्साह कायम
जळगाव : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी शहरात बंधूभाव व एकोप्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला. इतकेच काय बाजारपेठेतील व्यवहारही रोजच्याप्रमाणे सुरु होते. मुख्य चौकासह ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता़ चौका चौकात वाहतूक पोलिसही थांबून होते़ दुसरीकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंची तपासणी केली जात होती.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच नागरिकांनी आपले व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु ठेवले. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले सकाळीच घराबाहेर पडले. त्यांनी संवेदनशील भागात भेटी दिल्यानंतर ११ वाजता थेट नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला.
दरम्यान, दाणा बाजारातील हमाल व्यावसायिकांनी सुरुवातीला ‘बंद’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नंतर तो मागे घेतला, त्यामुळे दाणा बाजारातील व्यवहारही नेहमीप्रमाणे सुरु होते.
धान्याचे ट्रकही रोजच्याप्रमाणे दाणा बाजारात दाखल झाले होते. दुपारच्या सत्रात ग्राहकांचे प्रमाण कमी होते. मात्र, सायंकाळी पुन्हा बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली. दाणा बाजार, सुभाष चौक, गोलाणी मार्केट आदी परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरु होते.
शाळा व महाविद्यालयांना सुटी
शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.
अनेकांनी घरी अथवा रस्त्यावरील दुकानातील दूरदर्शन अथवा वृत्तवाहिन्यांवर हा निकाल पाहिला आणि त्यासाठी काही ठिकाणी लोकही उभे होते.
देशातील एकतेचा विजय
अयोध्या निकाल हा कुठल्याही धर्माचा विजय किंवा पराभव नसून हा सद्भावनेचा, एकतेचा, देशाचा विजय आहे़ असा सूर शहरातील मान्यवरांच्या सभेत उमटला़ निकालानंतर जी.एम फाऊंडेशन व जननायक फाऊंडेशनच्यावतीने यासदभावना सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेत आमदार सुरेश भोळे,करीम सालार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बॅनर्स, प्रिंटर्स व जाहीरात एजन्सीला नोटीस
या निकालाबाबतचे अभिनंदन किंवा निषेध असे कोणतेच प्रकारचे बॅनर्स, फ्लेक्स तयार करु नयेत तसेच त्याची प्रिंटीग करु नये यासाठी बॅनर्स व प्रिंटर्स चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याशिवाय बॅनरच्या जाहीरात एजन्सीलाही नोटीस बजावण्यात आली होती. सोशल मीडिया, जल्लोष, निषेध, मिरवणूक, गुलाल उधळणे याला निर्बंध घालण्यात आले होते.
गुप्तचर यंत्रणाही अलर्ट
जिल्ह्यात सीमीचे जाळे, जातीय दंगलीचे ठिकाण, संवेदनशील शहर व गावे यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. जळगाव, रावेर, भुसावळ, साकळी, अडावद येथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून काही लोकांवर गुप्तचर व पोलीस यंत्रणेची नजर ठेवण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसासाठी जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंद आदेश लागू केला आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाही याची सूचना देण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशन व विमानतळावर हाय अलर्ट
विमानतळ,रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्टेशनवर येणाºया रेल्वे गाड्यांची तसेच प्रवाशांकडील साहित्याची तपासणी केली जात होती.