जम्मू-काश्मिरातील कोरोनाच्या उपचारासाठी जळगावचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:36+5:302021-07-26T04:16:36+5:30
जळगाव : एकेकाळी देशाच्या मृत्यूदराच्या चारपट मृत्यूदर असलेल्या जळगाव जिल्ह्यात आज कोरोना स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याने येथील या ...
जळगाव : एकेकाळी देशाच्या मृत्यूदराच्या चारपट मृत्यूदर असलेल्या जळगाव जिल्ह्यात आज कोरोना स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याने येथील या उपाययोजना जम्मू-काश्मीरमध्येदेखील पूरक ठराव्या म्हणून जळगावातून सल्ला घेतला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्ष आरोग्य सेवा करीत काश्मीरच्या आरोग्य सेवेत हातभार लावल्याने जळगावातील डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्याकडे कोरोनाचा अहवाल पाठवून आवश्यक माहिती घेतली जात आहे.
डॉ.धर्मेद्र पाटील यांनी कुपवाडा, पुलवामा यासह वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भारतीय सैन्य दलाला आरोग्य सेवेत मदत करण्याचा निर्धार महाराष्ट्रातील डॉक्टरांनी बॉर्डर लेस फाउंडेशनच्या माध्यमातून केला. त्यामुळे काश्मीरात जाऊन दरवर्षी आरोग्य सेवा देण्याचे काम जळगावसह नाशिक व इतर ठिकाणच्या डॉक्टरांनी सुरू केले. यातूनच विश्वास निर्माण होऊन जळगावच्या उपचार पद्धतीचा आधार तेथे घेतला जात आहे.
या विषयी घेतली जाते माहिती
- संसर्ग नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना
- आरोग्य विभागातील उपचार पद्धती
- संसर्ग कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक
- म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी उपाययोजना
- लसीकरणाचे सकारात्मक परिणाम
जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षे आरोग्य सेवा केल्याने त्यातून विश्वास निर्माण झाला व तेथील कोरोना नियंत्रणात हातभार लागावा म्हणून जळगावातून माहिती घेतली जात आहे.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ
जम्मू-काश्मीरमधील कोरोना स्थिती नियंत्रणात येण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम केले जात आहे. यात भर म्हणून वेगवेगळ्या विभागातील मंडळींचा ग्रुप तयार केला असून त्यात जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश आहे. त्या माध्यमातून तेथील उपाययोजनांविषयीदेखील माहिती घेतली जाते.
- अमीर हमीद भट, आरोग्य विभाग, जम्मू-काश्मीर.