‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावचा डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:41+5:302021-06-06T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायत निधी आपली छाप ठेवली आहे.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गतमध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाला.
या समारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे आदी उपस्थितीत होते.
जामनेर नगरपरिषदेला तृतीय
या स्पर्धेत नगरपरिषद गटात राज्यातील २२२ नगरपरिषदा सहभागी झाली होत्या. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेला तृतीय क्रमांकांचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा साधना महाजन आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते ऑनलाईन स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट नगरपंचायत गटात राज्यातील १३० नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा नजमा तडवी आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात राज्यातील २९१ ग्रामपंचायतीची निवड झाली होती. या गटात जिल्ह्यातील चिनावल, (ता. रावेर) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार सरपंच भावना बोरोले आणि ग्रामसेवक संतोष सपकाळ यांनी स्वीकारला तर पहूरपेठ, (ता. जामनेर) ग्रामपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार सरपंच नीता पाटील आणि ग्रामसेवक दत्तात्रय टेमकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते स्वीकारला.