सुसाट वाहनचालकांविरोधात जळगावकरांचा एल्गार, 'त्या' कारचालकाच्या अटकेसाठी आक्रमक
By आकाश नेवे | Published: September 2, 2022 07:29 PM2022-09-02T19:29:30+5:302022-09-02T19:30:17+5:30
नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, विक्रांतचा बळी घेणाऱ्या कार मालकाच्या अटकेची मागणी
आकाश नेवे
जळगाव : मेहरुण तलावाच्या काठावर २८ ऑगस्ट रोजी सायकल चालवण्यास गेलेल्या विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) या मुलाला एका अल्पवयीन मुलाने कारने उडवले होते. या पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असले तरी यातील मुलाचे वडील मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा हे फरार झाले आहेत. त्यामुळे त्याला तातडीने अटक करावी आणि अल्पवयीन मुले जर वाहने चालवत असतील तर त्यांच्या पालकांना समज द्यावी, या मागणीसाठी जळगावकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शुक्रवारी जळगावकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यात संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. त्या आधीच पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडावी. आणि संशयित कार मालकाला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी प्रयत्न करावे. शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. अल्पवयीन मुले दुचाकी आणि चारचाकी बेभानपणे पळवतात. त्यांच्याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यानेच असे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालक मुले व मुलींना पकडावे, आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनीही आंदोलकांची भेट घेतली.
काय घडले होते?
मेहरूण तलावाच्या काठावर २८ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता एमएच १९ बीयू ६६०६ या कारने विक्रांत संतोष मिश्रा या ११ वर्षांच्या मुलाला जोरदार धडक दिली. कार चालक हा अल्पवयीन मुलगा होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र यात कायद्यानुसार अल्पवयीन मुलाचे वडील संशयित आरोपी आहेत. ते मात्र अद्यापही फरार आहे.
यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, नंदू अडवाणी, श्रीकांत खटोड, राजकुमार अडवाणी, नितीन बरडे, अशोक लाडवंजारी, अमर जैन, अभिषेक पाटील, सचिन नारळे, विराज कावडिया, गजानन मालपुरे, नीलेश पाटील, शंभु पाटील, युसुफ मकरा, दिलीप तिवारी, किशोर पाटील उपस्थित होते.