जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

By अमित महाबळ | Published: November 13, 2023 06:42 PM2023-11-13T18:42:27+5:302023-11-13T18:44:36+5:30

वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते.

Jalgaon's Vahanotsav from Tuesday direct relation of Shri Rama's Utsavmurthy to Ayodhya in jalgaon | जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथवहनोत्सव मंगळवारपासून सुरू होत असून, यावर्षी १० वहनांना ३० यजमानांच्या घरी पानसुपारी होणार आहे. ज्या ठिकाणी रथ जाऊ शकत नाही, त्या भागात वहन नेले जाते. वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात.

वहनोत्सवाचे १५१ वर्षे असून, मंगळवारी (दि.१४) त्याचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा आदी १० वहने निघतील. दरवर्षी नवरात्रीपासून वहनांसाठी पानसुपारी (आमंत्रण) स्वीकारली जाते. एका वहनाला सरासरी दोन ते तीन पानसुपारी होतात. वहन जाण्याचा मार्ग, मंदिरापासूनचे अंतर आदी बाबी विचारात घेऊन मंगेश महाराज जोशी व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील हे वहनाचे आमंत्रण निश्चित करत असतात. दरवर्षी सात ते आठ नवीन कुटुंबे अशी असतात की, ती प्रथमच वहनासाठी आमंत्रण देतात. यजमानांच्या घरी गेल्यावर वहनाची पूजा, भजन-भारुड, सोबत आलेल्या मंडळींचा सत्कार आदी कार्यक्रम होतात. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

श्रीरामाचे दोनच रथ, त्यापैकी एक जळगावचा...

देशात सर्वाधिक रथ बालाजीचे आहेत तर श्रीरामाचे दोनच रथ आहेत. जळगावचा श्रीराम रथ कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघतो. या तिथीला निघणारा हा रथ देशातील एकमेव आहे. रथाच्या आधीपासून (कार्तिक प्रतिपदा) वहनोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक दिवशीच्या वहनावर श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबतच्या पालखीमध्ये संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात. श्रीरामाची उत्सवमूर्ती संत अप्पा महाराजांना वयाच्या १५ व्या वर्षी शके १७८२ मध्ये आशीर्वाद रूपात प्राप्त झाली आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी दिली.

तिथीचा क्षय झाल्याने एक वहन कमी

यंदा षष्ठी व सप्तमी एकत्र आल्याने तिथीचा क्षय झाला आहे. त्यामुळे षष्ठीला निघणारे शेषनागाचे वहन नसेल. तिथीक्षयामुळे वहनांची संख्या कमी होते, त्याचप्रमाणे प्रतिपदा ते दशमीपर्यंत कोणत्याही तिथीची वृद्धीला झाली, तर वाढीव तिथीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे वहन निघते.
 

Web Title: Jalgaon's Vahanotsav from Tuesday direct relation of Shri Rama's Utsavmurthy to Ayodhya in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव