जळगाव जिल्ह्यात २७ लाखांच्या गुटख्यासह दारुचे रसायन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:24 PM2018-12-24T17:24:20+5:302018-12-24T17:26:34+5:30
वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दारुचे कच्चे रसायन जप्त केले.
जळगाव : वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दारुचे कच्चे रसायन जप्त केले. दरम्यान, या मोहीमेत २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर शहरात सिंधी कॉलनीत श्याम वरीयल दास वासवाणी, रवींद्र सुंदरदास बढेजा व रवींद्र जगन्नाथ पाटील, रा.शनी पेठ, जळगाव अशा तीन जणांच्या घरी छापा टाकला. त्यांच्याकडे एकूण २७ लाख १५ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक बापू रोहम सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र बोरसे, राजेंद्र पाटील, प्रवीण हिवराळे, रवींद्र गिरासे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, व श्रीकृष्ण पटवर्धन आदींसह एक आरएसपी प्लाटून व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान,अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे याना बोलावून पंचनामा करण्यात आला.
जुगारात ५१ हजाराची रोकड हस्तगत
भुसावळ बाजार पेठ पोलिसांच्या हद्दीत जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीत ५१ हजार १० रुपये जप्त करण्यात आले.
एमआयडीसी, जळगाव शहर, तालुका, रामानंद नगर, भुसावळ, वरणगाव,बोदवड, चोपडा ग्रामीण, मारवड, पारोळा, एरंडोल, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, पहूर, कासोदा व मेहुणबारे आदी ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आल्या. तेथे गावठी दारु, देशी विदेशी दारु, सट्टा, जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. एकाच वेळी जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली.