जळगाव जिल्हा वाहतूक शाखा व भुसावळ नियंत्रण कक्ष बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:37 PM2018-09-30T12:37:38+5:302018-09-30T12:38:45+5:30
पोलीस अधीक्षकांचा निर्णय
सुनील पाटील
जळगाव : जिल्हा वाहतूक शाखा व भुसावळ येथील पोलीस नियंत्रण कक्ष या दोन्ही शाखा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी बरखास्त केल्या. या दोन्ही शाखांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये रिक्त असलेल्या जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही शाखांच्या कर्मचाºयांना शनिवारी पोलीस अधीक्षकांनी पाचारण केले होते.
या कारणांमुळे घेतला एसपींनी निर्णय
पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाºयांची वाणवा असताना भुसावळ नियंत्रण कक्षात ३७ तर जिल्हा वाहतूक शाखेत ६५ कर्मचारी नियुक्तीला होते. या दोन्ही शाखांमधून पोलीस दलाला उपयुक्त असे कोणतेच काम होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही शाखा बरखास्त करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक शिंदे यांनी घेतला.
जिल्हा वाहतूक शाखेत तीन वर्ष पूर्ण न झालेल्या कर्मचाºयांना जळगाव व भुसावळ येथील वाहतूक शाखेत नियुक्ती देण्यात येणार आहे तर जे वारंवार वाहतूक शाखेत बदलून आलेले आहेत तसेच यापूर्वी वाहतूक शाखेत काम केलेले आहे, अशांन पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शनिवारी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिवसभर प्रत्येक कर्मचाºयांची वैयक्तिक माहिती व विनंतीचे ठिकाण जाणून घेतले.
भुसावळ विभागात रिक्त पदांची संख्या अधिक
भुसावळ विभागात शहर पोलीस स्टेशनला १११ कर्मचारी मंजूर आहेत, त्यापैकी फक्त ५६ कर्मचारी कार्यरत आहेत तर ६५ पदे रिक्त आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनला १०३ कर्मचारी मंजूर आहेत, त्यापैकी ८५ कर्मचारी कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. शहर वाहतूक शाखेत १८ कर्मचारी मंजूर आहेत, प्रत्यक्षात १० कर्मचारी कार्यरत आहेत.दरम्यान, वाहतूक शाखेचे कर्मचारी मुळ काम सोडून इतर उद्योग जास्त करीत असल्याच्या तक्रारी होत्या.
मक्तेदारी काढली मोडीत
भुसावळ नियंत्रण कक्ष बरखास्त केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी काही विशिष्ट कर्मचाºयांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. अनेक कर्मचारी नियंत्रण कक्ष व भुसावळातील पोलीस स्टेशन असेच २० वर्षापासून भुसावळात कार्यरत होते. त्याशिवाय जिल्हा वाहतूक शाखेत आलेल्या कर्मचाºयांचीही मक्तेदारी मोडीत निघाली आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी २ जून २०१८ रोजी जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी शहर वाहतूक शाखेला संलग्न केले होते. ही शाखा पुन्हा सुरु होईल, असा समज होता, मात्र पोलीस अधीक्षक शिंदे यांनी शाखाच बरखास्त करुन या कर्मचाºयांना जिल्ह्यात बदल्या करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांया कार्यकाळा जिल्हा वाहतूक शाखा सुरु झाली होती.
३६ वर्षापूर्वी नियंत्रण कक्षाची निर्मिती
भुसावळ येथे आॅक्टोबर १९८२ मध्ये पोलीस नियंत्रण कक्षाची निर्मिती झाली होती. भुसावळ विभाग जातीयदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने तेथे किरकोळ कारणावरुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने त्या काळी तत्काळ जादा कुमक मिळत नव्हती. त्यामुळे भुसावळ येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रारंभीच्या काळात १ उपनिरीक्षक व ४५ कर्मचाºयांची नियुक्ती झाली होती. सद्यस्थितीत एकमेकांशी संपर्क साधण्याचे अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळे नियंत्रण कक्षाचे वेगळे महत्व राहिलेले नाही.सद्यस्थितीत तेथे ३७ कर्मचारी नियुक्तीला आहेत. त्यातील ११ कर्मचारी पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नियुक्तीला आहेत.
भुसावळ नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक शाखेला कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आज बोलावण्यात आले होते. सोमवारी या सर्वांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. दोन्ही शाखा आता बरखास्त झालेल्या आहेत. ज्या कर्मचाºयाने यापूर्वी कधीच वाहतूक शाखेत काम केलेले नाही, त्यांना वाहतूक शाखेत तर ज्यांनी याआधी काम केले आहे, त्यांना इतर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली जाईल.
-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक