जळगाव मनपा निवडणूक : रात्री ११ नंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट व वॉईन शॉप सुरुच; मद्यपींची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:07 PM2018-07-24T13:07:11+5:302018-07-24T13:08:35+5:30
नियमांचे उल्लंघन
जळगाव : निवडणूक काळात हॉटेल्स, बियर बार, रेस्टॉरंट व हातगाड्या रात्री अकरा तर इतर आस्थापना दहा वाजता बंद करणे आवश्यक असताना रात्री अकरा वाजेनंतरही शहरात व महामार्गावर सर्रासपणे काही हॉटेल्स, ढाबे, हातगाड्या व अन्य आस्थापना सुरु रहात असून तेथे मद्यप्राशन होत असल्याचे ‘लोकमत’ ने रविवारी रात्री केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले.
सांगली येथे महापालिका निवडणूक सुरु आहे. तेथील आस्थापना रात्री दहा वाजेनंतर बंद करण्याचे आदेश असतानाही सुुरु आढळल्याने राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी एक पोलीस निरीक्षक व एक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अशा दोघांना तडकाफडकी निलंबित केले. जळगावलाही महानगरपालिकेची निवडणूक सुरु आहे. जळगावात नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा ‘लोकमत’ने घेतला.
महामार्गावरील ढाब्यांवर मद्यपींची गर्दी
शहरासह परिसरात महामार्गावरील ढाब्यांवर रविवारी रात्री मद्यपींची गर्दी होती. बाहेरुन दुकानातून दारु आणून ढाब्यावर बसून दारु रिचविताना अनेकजण दिसून आले. अजिंठा चौक परिसरातील एका ढाबा चालकाला दारुबाबत विचारणा केली असता दारु मिळणार नाही, मात्र जेवण उशिरापर्यंत मिळेल. बाहेरुन दारु आणून तुम्ही बसू शकता असे या ढाबा चालकाने सांगितले.
रेल्वे स्टेशनपरिसरात अंडापावच्यागाड्या सुरुच
भास्कर मार्केट व गुजराल पेट्रोलपंप, शिवकॉलनी परिसरातील हॉटेल्स बंद होत्या़ रेल्वेस्टेशन परिसरात अंडापाव व खाद्यपदार्थाच्या गाड्या मात्र सुरू असल्याचेही चित्र पहायवयास मिळाले़ याभागातील एका वॉईन शॉपमध्ये तर ग्राहक येताच शटर उघडून दारु विक्री केली जात होती़
शाहू नगरातील वॉईन शॉपवर गर्दी
रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शाहूनगर भागातील एका वॉईन शॉप तसेच हॉटेलवर तरूणांची प्रचंड गर्दी गर्दी होती़ रस्त्यातच वाहने उभी करून तरूणांचा घोळका त्या ठिकाणी उभा होता़
विशेष म्हणजे गस्तीवर असलेले पोलीस तेथून गेले तरी देखील विक्री सुरुच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
पोलीस वाहनावर ‘वॉच’
रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेल व वॉईन शॉप चालकाकडून दुकानाच्या बाहेर एका कामगाराला उभे केले होते़ हा कामगार येणाऱ्या जाणाºयासह पोलीस वाहन येत आहे का यावर लक्ष ठेऊन होता. अंडापावच्या हातगाड्या चालकांना तर कुणाचीच भीती नाही याप्रमाणे त्यांचा व्यवसाय सुरु होता. गोविंदा रिक्षा स्टॉप व गोलाणी मार्केट परिसरातील आईस्क्रीम पार्लर देखील रात्री साडे अकरानंतर देखील सुरू होते़
भजेगल्लीत लपून-छपून विक्री
भजेगल्लीत तीन ते चार मोठ्या हॉटेल्स बंद होत्या, मात्र एका मोठ्या हॉटेलमध्ये बाहेरुन दरवाजा बंद करुन आतमध्ये मद्यविक्री व जेवण सुरु असल्याचे दिसून आले. अंडापावच्याही गाड्याही सुरु होत्या. पानटपरीही सुरु होती.
कारवाई थंडावली...काही दिवसांपूर्वी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला होता़ मात्र, आता या विभागाची कारवाई थंडावली असल्यामुळे हॉटेल, ढाबे म्हणजे मद्यपींचे अड्डे बनल्याचे चित्र आहे. तेथेच इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या जेवणावळी सुरू आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याआधी संबंधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.