जळगाव मनपा निवडणूक : भाजपा मेळाव्याच्या बॅनरवरून प्रदेशाध्यक्षांचाच फोटो गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:20 PM2018-07-27T13:20:17+5:302018-07-27T13:20:52+5:30
एकनाथराव खडसे यांची पाठ
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून घेण्यात आलेला कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र व्यासपीठावरील बॅनर त्यांचा फोटो व नावच नव्हते. याबाबत मेळावास्थळी कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरु होती. दरम्यान प्रदेशाध्यक्षांचा दौरा रद्द झाल्याने व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना अचानक मुंबईला जावे लागल्याने हा मेळावा रद्द करण्यात आला. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शहरात असतानाही तेमेळाव्याला आले नाही, याबाबतही मेळाव्यास्थळी चर्चा सुरु होती.
महापालिका निवडणुकीनिमित्त भाजपाची बुथनिहाय रचना व मतदान प्रक्रियेतील बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा सहभाग यावर मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा महानगरतर्फे येथील मॉर्डन गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर गुरुवारी दुपारी १.३० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.
नातेवाईकांच्या निधनामुळे प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती
मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांनी जळगाव दौरा रद्द केला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
जलसंपदा मंत्री तत्काळ मुंबईकडे रवाना
या मेळाव्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते.
सकाळी ११ वाजता ते जळगावात दाखल झाले. त्यानंतर काही वेळ त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलविल्याने दुपारी ते मुंबईकडे रवाना झाले.
त्यानंतर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल व काही पदाधिकारी मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले. शेवटी महानगरप्रमुख व आमदार सुरेश भोळे यांनी मेळावा रद्द झाल्याची घोषणा केली.
एकनाथराव खडसे यांनी मेळाव्याला येणे टाळले
कार्यक्रमस्थळी किमान दोन ते तीन हजार कार्यकर्ते उपस्थित होते. याच दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे हे देखील जळगाव शहरात होते.
प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री अनुपस्थित राहणार असल्याने त्यांनी देखील कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ फिरविली.
या मेळाव्यासाठी डिजिटल बॅनर तयार करण्यात आले होते. हे बॅनर व्यासपीठावर लावण्यात आले होते.
त्यावर भाजपातील दिल्लीपासून तर जळगावातील नेत्यांपर्यंतचे फोटो होते मात्र प्रदेशाध्यक्षांचा फोटो व नावहीनसल्याने काही भाजपा कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली.
... आणि पालकमंत्र्यांचा दौरा झाला रद्द
मनपा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे २६ रोजी जळगाव दौºयावर येणार होते मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीमुळे त्यांचा दौरा रद्द झाला. ते मराठा आरक्षणाबाबतच्या शासनच्या समितीचे अध्यक्ष असून मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी त्यांना मुंबईतच थांबावे लागले.
दानवेंच्या फोटोबाबत तांत्रिक चूक
आमदार सुरेश भोळे यांनी प्रदेशाध्यक्ष येणार नसल्याने मेळावा रद्द केल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष हे प्रमुख मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांचाच फोटो बॅनरवर नसल्याचे विचारल्यानंतर त्यांनी याबाबत नियोजनाची जबाबदारी असलेल्या विशाल त्रिपाठी यांना विचारणा केली. मात्र तांत्रिक चुक असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली.
मेळाव्यास प्रदेशाध्यक्षच येवू न शकल्याने तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता. यावेळेत मी शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसेच बैठकाही घेतल्या.
-एकनाथराव खडसे, आमदार
कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मार्गदर्शन करणार होते. त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते जळगावात येऊ शकले नाही. त्यामुळे मेळावा रद्द करण्यात आला. डिजिटल बॅनरवर प्रदेशाध्यक्षांचे नाव व फोटो नाही ही चुक आहेच. मात्र ती तांत्रिक चुक आहे.
-सुरेश भोळे, आमदार