जळगाव मनपा निवडणूक : संवेदनशील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:35 PM2018-07-18T12:35:53+5:302018-07-18T12:36:37+5:30
पोलीस अधीक्षकांसोबत घेतला आढावा
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी मंगळवारी शहरातील शनिपेठ, तांबापुरा या भागातील संवेदनशिल मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय क राळे यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून प्राजक्ता लवंगारे या मनपात आल्या. सतराव्या मजल्यावरील महापौरांच्या दालनात त्यांचे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले आहे.
या ठिकाणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांची वेगवेगळी बैठक घेतली.
शेवटच्या आठवड्यात नागरिकांशीही चर्चा करणार
निवडणुकीच्या तयारी आढावा घेतल्यानंतर दुपारी २ वाजता शहरातील काही संवेदनशिल मतदानकेंद्रांना भेटी दिल्या.
या मतदान केंद्रावर मतदारांच्या सुविधांबाबत लक्ष देण्याचा सूचना मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, २४ ते २६ जुलै व १ ते ३ आॅगस्ट दरम्यान, प्राजक्ता लवंगारे या शहरातच थांबणार असून, दुपारी ४ ते ५ या दरम्यान, त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या काळात शहरातील नागरिक निवडणुकीविषयीच्या अडचणी लवंगारे यांच्यासमोर मांडू शकणार आहेत.