जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ४ ब मध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:33 PM2018-07-26T12:33:35+5:302018-07-26T12:34:25+5:30
कोण बाजी मारणार? : शहरवासीयांचे लक्ष
जळगाव : मनपा निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात प्रभाग ४ मधील चारही लढती रंगतदार ठरणार आहेत. मात्र, प्रभाग ४ ब मध्ये माजी महापौर जयश्री धांडे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जयश्री धांडे यांच्यासह माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
या प्रभागात अन्य तीन लढती या तिरंगी व चौरंगी रंगणार असल्या तरी भारती सोनवणे व जयश्री धांडे यांच्यातील लढत ही सरळ होणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार अपर्णा भालोदकर यांनी माघार घेतल्याने आता केवळ या दोनच उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. कैलास सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेनेदेखील त्यांच्यासमोर तोडीसतोड उमेदवार देऊन कडवे आव्हान उभे केले आहे.
दोन्ही उमेदवारांचा लागणार कस
भारती सोनवणे या सहाव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर जयश्री धांडे यादेखील पाचव्यांदा निवडणूक लढवत असल्याने दोन्हीही उमेदवारांकडे निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आहे.
दोन्हीही उमेदवार अनेक वर्षे सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांची ताकद व कच्चे दुवेदेखील माहिती आहे. या दोन्हीही उमेदवारांसोबत इतर गटातदेखील शिवसेना व भाजपाने दिलेले उमेदवार तगडे असल्याने या दोन्हीही उमेदवारांना विजय तसा सोपा म्हणता येणार नाही. दोन्हीही उमेदवारांचा कस लागणार हे निश्चित आहे.
महापौरपदासाठी राखीव जागा असल्याने महत्त्व
प्रभाग ४ ब हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव असून, महापौरपददेखील ओबीसी महिला राखीव असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या लढतीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचनेतील बदल कोणाच्या पथ्यावर पडणार?
माजी महापौर रमेशदादा जैन व भारती सोनवणे यांचा जुना प्रभाग २१, विजय कोल्हे व खुशबू बनसोडे यांचा जुना प्रभाग क्रमांक २२, तर भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते वामनराव खडके व ममता कोल्हे यांच्या प्रभाग २३ चा काही भाग व भाजपाचे गटनेते सुनील माळी व राष्टÑवादीच्या कंचन सनकत यांच्या प्रभाग ७ चा काही भाग मिळून नव्याने प्रभाग क्रमांक ४ तयार झाला आहे. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचा जुना २१ क्रमांकाचा प्रभाग हा त्यांचा बालेकिल्ला होता. मात्र आता जुने गाव या प्रभागाला जोडले गेले आहे.
या प्रभागात येणारा भाग
या प्रभागात शनिपेठ, दालफड, चौघुले मळा, ओक प्लॉट, बळीरामपेठ, शनिपेठ, नानकनगर, जोशीपेठ, मारोतीपेठ, बालाजीपेठ, रामपेठ, विठ्ठलपेठेचा भागाचा समावेश आहे.