जळगाव मनपा निवडणूक : प्रचार संपल्यानंतर पैसे वाटपाला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:04 PM2018-07-31T13:04:05+5:302018-07-31T13:05:01+5:30
रात्र वैऱ्याची
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत असून त्याच्या ४८ तास आधी म्हणजेच सोमवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर थेट किंवा जाहिरातींच्या माध्यमातून अथवा सोशलमिडियाच्या माध्यमातूनही प्रचार करण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई असतानाही रात्री उमेदवारांकडून मतदारांना लपूनछपून पैसे वाटपासाठी चिठ्ठ्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ३० व ३१ जुलै रोजीच्या रात्रीचाही ‘दिवस’ करण्याचे नियोजन केले आहे.
सोमवारी रात्री त्याचा प्रत्यय आला. अमूक भागात तमूक वाटतो आहे. एवढा भाव फुटला, उमेदवार अमुकच्या ठिकाणी बसला आहे. अश वावड्या उठत होत्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते व पोलिसांचीही तारांबळ उडत होती. मंगळवार, ३१ जुलै रोजी दिवसभर व रात्रीही हे सर्व प्रकार आणखी जोमात सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी याबाबत तक्रारी करण्यासाठी कर्मचाºयांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले असून त्यावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक प्रशासन आणि पोलिसांच्या दृष्टीने रात्र वैºयाची ठरणार आहे.
सोमवार, ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार संपल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी बंद झाल्या. तरीही अफवांचे सत्र मात्र सुरू झाले होते. मतदानाच्या आदल्या दिवसाची रात्र उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह राजकीय पक्षांनाही मोठी आव्हानात्मक असते. तोच प्रकार जळगावातही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विशेषत: तगडे उमेदवार, प्रतिष्ठेच्या लढती या ठिकाणी असे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
सोशल मिडियावरही प्रचारास बंदी
मनपाचा प्रचार ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपला. हा प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियाद्वारे तसेच प्रिंट मिडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील. यामध्ये एसएमएस, सोश्ल मिडिया याचाही समावेश आहे. निवडणुकीच्या कायात इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर केल्यास, त्याद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसिद्ध केल्यास सायबर गुन्ह्याचा (बंदी, प्रतिबंध इ.) कायदा २०१५ अंतर्गत तरतुदीनुसार तसेच इतर संबंधीत कायद्यानुसार कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिला आहे.
मुदत संपल्याने जाहीर प्रचार करण्यास अथवा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास बंदी असली तरीही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे घरोघरी फिरून मतदारांना आवाहन करीतच असल्याचे दिसून आले.
आधी चिठ्ठ्या नंतर पैसे
राजकारणी मंडळींनी निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटप करून मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू केले. मात्र आता त्याची मतदारांनाच चटक लागली आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदार पैसेवाटपाची वाट बघत असतात. काही तर थेट उमेदवारांनाच फोन करून अथवा प्रत्यक्ष गाठून आमच्याकडे इतके मतदार आहेत. काही-तरी करा, असे सांगत आहेत. उमेदवाराने नकार दिला तर शिवीगाळ करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. तसे काही प्रकारच उघडकीस आले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री पैसे वाटण्याऐवजी चिठ्ठ्या वाटण्याचे काम सुरू होते. त्या चिठ्ठ्यांमध्ये मतदार संख्या व रक्कम याचा उल्लेख असून मतदानाच्यावेळी नेमून दिलेल्या माणसांकडून ती रक्कम वाटप केली जाणार असल्याचे समजते.
येथे करा तक्रार
काही तक्रार असल्यास आचारसंहिता कक्ष, मनपा ११वा मजला येथे तक्रार स्विकारली जाणार आहे. किंवा एच.एम. खान- ८६२५९९६६२४, विजय देशमुख- ७३५००५०६९३, उमाकांत नष्टे- ९४०३९०५८८५ या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावी. तक्रार संदेशासह पाठविणाºयाचे नाव, मेसेज केव्हा आला यासह पाठवावी. तसेच त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलीस सांगत नाही तोपर्यंत तक्रार व पुरावे डिलीट करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.