जळगाव जि.प.च्या सभेत पाणीप्रश्न गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:14 PM2019-05-22T12:14:56+5:302019-05-22T12:15:24+5:30
आता आमचे कपडे फाटायची वेळ आली आहे ; सर्व सदस्य आक्रमक
जळगाव : जिल्हाभरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत असताना अधिकारी, कर्मचारी एसीत बसून कागदोपत्री टंचाईमुक्तीच्या गप्पा करीत असून आमच्या गटात आता केवळ आमचे कपडे फाटायची वेळ आली आहे. अशी आक्रमक भूमिका घेत सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. टंचाईचा विषय सर्वत्र पेटला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष आहे़ प्रशासनाकडून मात्र, टँकर मंजूर असतानाही बंद करण्यात येतात, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात, असा आक्षेप अनेक सदस्यांनी घेत़ एसीच्या थंड हवेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फोडला़
आचारसंहितेच्या सावटतात झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सुरूवातीपासून वादळी झाली़ दोन वाजेची वेळ असताना वीस मिनिटांनी सभेला उशीरा सुरूवात झाल्याने सदस्या पल्लवी सावकारे यांनी संताप व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांना गांभिर्य नसल्याचा आरोप केला़ सभा कधी सुरू करताय अशी विचारणा केली़ अध्यक्षा उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व शिक्षण सभापती पोपट भोळे हे अनुपस्थित असल्याने अखेर महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
अनुकंपा भरतीबाबत चौकशी
जि.प.२१३ जागा मंजूर असताना २४९ कर्मचाºयांना नियुक्ती देण्यात आली आहे़ यात ३६ पदे अतिरिक्त असताना त्यात आणखी अनुकंपा तत्त्वार सहा जणांना नियुक्ती देण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ एस़ अकलाडे यांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन नियुक्त्या दिल्याचा आरोप सदस्य गोपाळ चौधरी यांनी केला़ यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली़ यावर स्वतंत्र चौकशी करून महिनाभरात अहवाल देऊ, असे आश्वासन अतिरिक्त संजय मस्कर यांनी दिले़ आपण या कर्मचाºयांचे पगार देणार कुठून आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ आपण या बाबत सचिवांकडे तक्रार करू, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले़ रिक्त जागा नसताना जिल्हा परिषदेत अनुकंपाची भरती याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते़
अधिकारी घामाघूम
मंगळवारी तापामानात वाढ जाणवत होती़ अशा स्थितीत सभागृहातील एसी चालू बंद होत होते़ अशाच स्थितीत पाणीटंचाईवर वादळी चर्चा झाली़ सदस्य नानाभाऊ महाजन यांनी पंधरा मिनिटांपर्यंत टंचाईचे चटके किती तीव्र आहे, याबाबत माहिती देत़ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले़ विहिर खोलीकरणाचे प्रस्ताव तीन तीन महिने मंजूर होत नाही, जीएसडीएला(भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा) कर्मचारी नाही त्यामुळे स्त्रोत कळणार कसे,आपण एसीत बसून केवळ गप्पा ठोकतो़ अशी आक्रमक भूमिका मांडत विखरणला पाणीपुरवठा नसताना टंँकर अचानक बंद असल्याचे त्यांनी सांगितले़ पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागात अडिचशे टँकर सुरू आहे़ आपल्या जिल्ह्यात मात्र दोनशेच टँकर कसे, सहाशे गावांमध्ये पाणीटंचाई असताना ऐवढ्या कमी टँकरवर तहान भागणार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ सदस्यांच्या अक्रमक भूमिकेपुढे अधिकारी घामाघूम झाले होते़ पाणीटंचाईवर गाजलेल्या दोन तासांच्या याबैठकीत प्रत्येकाने किमान दोनदोन बॉटल पाणी पिले़ ४९ विहिरींचे प्रस्ताव आले होते़ त्यापैकी १६ कामे झालेली आहेत़ अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता नरवाडे यांनी दिली़
‘लोकमत’च्या टँकर स्टींगचे कौतुक... भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथे पाणीपाुरवठ्यासाठी वापरण्यात येणारा टँकर अतिशय गळका असून हा टँकर भुसावळ पालिकेच्या विहिरीवरून भरण्याचे आदेश होते मात्र हा टँकर कधी कुºहे पानाचे येथील गावातून तर कधी धरणाच्या बॅकवॉटर जवळील एक नर्सरीमधील भरण्यात येत होता़ ‘लोकमत’ने यासंदर्भात स्टींग आॅपरेशन करून ही बाब उघडकीस आणली होती़ ‘लोकमत’ने स्टिंग केले म्हणून प्रशासनाला जाग आल्याचे सांगत सदस्या पल्लवी सावकारे यांनी लोकमत प्रतिनिधी उत्तम काळे यांचे अभिनंदन केले़ यासह अधिकाºयांना या मुद्यावरून धारेवर धरले़ यासदंर्भात भुसावळ बीडिओंना तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी आदेश दिले आहेत़ कोºया रजिस्टरवर सह्या घेतल्या जात असून यातून ठेकदारांचेचे पोषण होत आहे, जीपीएस केवळ लावून उपयोग नाही, ती तपासली गेली पाहिजे असा मुद्दाही सदस्या सावकारे यांनी मांडला़
पाचोºयात वीस ते पंचवीस टँकर रस्त्यावरच उभे
जि.प.ने डिझेलचे पैसे थकविल्याने २० ते २५ टँकर रस्त्यावर उभे आहेत़ लोक फोटो टाकून आम्हाला विचारणा करून आमच्यावर टीका होत असल्याचा मुद्दा मधू काटे यांनी मांडला़ यावर जिल्हाभरातील टँकरसाठी आलेली ३ कोटी ४४ लाखांची रक्कम सर्व गटविकास अधिकाºयांच्या स्तरावर पाठविली आहे़ त्यात पाचोºयाच्या दहा लाखांचाही समावेश असल्याचे नरवाडे यांनी सांगितले़तांत्रिक बाबीमुळे ही रक्कम पाचोºयात पोहचली नसल्याचे लेखा व वित्त अधिकाºयांनी स्पष्ट केले़ चहार्डीच्या २५ हजार ग्रामस्थांसाठी दोनच बोरवेल मंजूर का पर्यायी पाण्यासाठी व्यवस्था काय करणार अशी विचारणा नीलिमा पाटील यांनी केली़
कांताई बंधाºयाचे १ कोटी ८३ लाख थकीत - गोपाळ चौधरी
मोहाडी व शिरसोली शिवारातील पाझर तलाव नियोजित संस्था कांताबाई भवरलाल जैन फॅमिली नॉले इन्स्टीट्युट अंतर्गत शैक्षणिक व अभ्यासाच्या प्रयोजनार्थ सदर तलावांचे देखभाल, जतन व संवर्धन हेतू तीस वर्षांच्या कालावधीसाठी कराराअंतर्गत मिळावा, अशा प्रस्ताव आल्यानंतर शेतकरी वर्ग पाण्यापासून वंचित राहील, लोकांना पाणी मिळत नाही असे सांगत सदस्य गोपाळ चौधरी यांनी याबाबत विरोध दर्शविला होता़ त्यावेळी तीस वर्षांऐवजी ११ वर्षांचा करार करावा प्रति तलाव वार्षीक २० हजारांची आकारणी करावी व त्यात पाच वर्षानंतर वाढ करावी, असा ठराव करण्यात आला होता़ मात्र, ठरावानंतरही ११ ऐवजी ३० वर्षांचा उल्लेख इतिवृत्तात असल्याने ठराव झाला असताना असे झाले कसे असा सवाल उपस्थित करून यावर कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी सभेत केली़ ही प्रिटींग मिस्टेक असल्याचे स्पष्टीकरण अकलाडे यांनी दिले़ यासह कांताई बंधाºयासाठी पाणी उचल केली जात असताना २०१३ पासून या बंधाºयाचे १ कोटी ८३ लाख रूपये थकीत आहे़ एकीकडे गावे तहानलेली असताना प्रशासन पैसाने बंधाºयासाठी पाणी देते आणि वर पैसेही थकविले जातात़ ही वसुली करणार कोण? असा सवाल उपस्थित केला. आधी पाच वर्षाचे भडे घ्यावे अशी मागणी चौधरी यांनी केली़ यावर तुम्ही तसा ठराव करा आम्ही करारात तशा अटी शर्ती टाकतो असे मस्कर यांनी सांगितले़