जामनेर प्रभारी मुख्याध्यापक नियुक्ती वाद मंत्रालयात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:54 PM2020-02-17T17:54:13+5:302020-02-17T17:55:58+5:30
महिन्यापासून शिक्षण विभागाकडून शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
जामनेर, जि.जळगाव : शंभरी पार केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रद्दी घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापकांच्या नियुक्तीवरून राजकारण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून शिक्षण विभागाकडून शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हा विषय मंत्रालयापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभारी मुख्याध्यापक बी.आर.चौेधरी यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, त्यापूर्वीच ते रजेवर गेले. जि.प.शिक्षण विभागाने एस.पी.महाजन यांची नियुक्ती करुन ती रद्द ठरविल्यानंतर पद रिक्तच आहे.
दीड वर्षांपासून शिक्षण संस्थाचालकांमध्ये सुरू असलेले वाद धर्मदाय आयुक्त व न्यायालयात प्रलंबित आहेत. मुख्याध्यापक पद नियुक्तीत दोन्ही गटांकडून होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाने जि.प.चा शिक्षण विभाग त्रस्त झाला आहे.
दरम्यान, प्रभारी मुख्याध्यापक नियुक्तीची फाईल मंत्रालयात पोहचली असल्याने निर्णय लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.
लवकरच दहावीसह इतर वर्गांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. तसेच वेतन रखडल्याने मुख्याध्यापकाची नियुक्ती तातडीने व्हावी, अशी मागणी केली जात आहे.