जामनेर तलाठी कार्यालयाचे विभाजन लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:30 PM2018-12-14T16:30:51+5:302018-12-14T16:33:29+5:30
जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे.
जामनेर : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. परिणामी मुख्य कार्यालयातील अपुऱ्या मनुष्य बळामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. सहाय्यक तलाठी पद रिक्त असून ते तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.
शहराची वाढलेली लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा पडतो. सातबारा उतारे, शेतजमिनीचे आवश्यक दस्तावेज मिळविण्यासाठी नागरिकांना तासनतास थांबावे लागते. कोतवाल पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. या महिन्यात येथे कोतवालाची नियुक्ती झालेली आहे, मात्र सहाय्यक तलाठीपद रिक्तच आहे.
तलाठी कार्यालयाचे विभाजन करून पूरा भागात, पश्चिम भाग एक असे दोन नवीन व मुख्य तलाठी कार्यालय असे विभाजनाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. मात्र अंमलबजावणी झालेली नाही. बुधवारी सकाळी या कार्यालयात कामांसाठी आलेल्या नागरिकांना तलाठी व कोतवाल नसल्याने प्रतीक्षा करावी लागली. त्यांच्याकडे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची कामे सोपविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी तलाठी कार्यालयाची या विभाजनाची अंमलबजावणी तातडीने करावी व सहाय्यक तलाठी पद भरावे, अशी मागणी होत आहे.