जामनेरात ३०० कोटींच्या निधीचा तपशील मागून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:59 PM2018-02-15T15:59:10+5:302018-02-15T16:01:11+5:30
जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर सुरु झाले आरोप-प्रत्यारोप
आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.१५ : नगरपालिका निवडणूक जवळ येत असतांनाच सोशल मिडीयावर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपा विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असा सामना रंगत आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी विकासासाठी आणलेल्या ३०० कोटींच्या निधीचा तपशील मागुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडुन होत आहे.
नगरपालिकेकडुन मंजुर झालेल्या कामांच्या भुमीपुजन व पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण कार्यक्रम होत आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाकडुन ३०० कोटी आणल्याचा दावा मंत्री महाजन करीत आहे. नेमकी याच विषयाची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.
असे आहेत आक्षेप
विकासासाठी मिळालेल्या ३०० कोटीबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तपशिलाची मागणी करीत आहे. त्याच बरोबर काँग्रेस आघाडीच्या काळातील नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी मिळविलेल्या निधीतुनच कामे होत असल्याचा त्यांचा दावा आहे. होत असलेल्या कामाची गुणवत्ता संशयास्पद असल्याची ओरड देखील केली जात असुन कामे करीत असलेल्या ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. रस्ते खोदणे, बुजणे व जलवाहिनीसाठी किंवा भुमिगत गटारीसाठी वारंवार पुन्हा तेच करणे यालाच विकास म्हणतात काय? असा खोचक सवाल विरोधक विचारीत आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा पलटवार
विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांना भाजप कार्यकर्ते व समर्थक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मागील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस आघाडीला बहुमताने सत्ता सोपवुन देखील त्यांच्यातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी तडजोड करुन सत्तेची सुत्रे सोपविल्याचा आरोप केला जातो. तसेच या फुटीर नगरसेवकांना मतदारच धडा शिकवतील असा पलटवार केला जात आहे.