जामनेरला महिलांचा पं.स.वर हंडामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:28 AM2019-03-15T00:28:38+5:302019-03-15T00:28:47+5:30
नवीदाभाडी येथे पाण्याअभावी प्रचंड हाल
जामनेर : तालुक्यातील नवीदाभाडी (वाडी) येथील पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करण्यासह कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी जामनेर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास आधिकारी अजय जोशी यांना ग्रामस्थांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नवीदाभाडी (वाडी) येथे विशेषत: दलित वस्तीमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप लेखी निवेदनात व तोंडीही करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामांच्या बाबतीतही हेतूपुरस्सर आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते यासह अनेक समस्या यावेळी महिलांनी या वेळी मांडल्या.
जस-जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी-तशी तालुक्यातील पाणी समस्येने डोके वर काढले असून अनेक नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात बहुतांश धरणे-तलावांमधून गावांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी दहा-ते बारा वर्ष झाली तरी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश योजनांना अद्यापही मुर्तरूप येऊ शकले नाही. याचाही फटका अनेक गावांना नाहक सहन करावा लागत आहे. असाच प्रकार नवीदाभाडीचाही असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुबलकपणे पाणी आहे मात्र पाईपलाईन कशी व कोठून टाकावी याविषयी सुद्धा आपसात वाद असल्याचे सांगण्यात येते. यावेळी आलेल्या हंडा मोर्चामधे ग्रामपंचायत सदस्या रूपाली जंजाळे यांच्यासह गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.