जामनेर बीएसएनएल आॅफिसला लागले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:18 PM2020-02-04T15:18:08+5:302020-02-04T15:18:54+5:30
भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या जामनेर येथील कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने याठिकाणी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जामनेर, जि.जळगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या जामनेर येथील कार्यालयातील व तालुक्यातील सुमारे २२ कर्मचाऱ्यांनी ३१ जानेवारीला स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने याठिकाणी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे कंपनीने कुठलेही नियोजन केले नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असूनदेखील कार्यालय बंद असल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले. याठिकाणी २२ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त चार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक शिपाई व तीन कर्मचारी असा कर्मचारी वर्ग आहे. त्यातील एक कर्मचारी सुट्टीवर असल्याने सोमवारी ग्राहक सेवा केंद्र हे बंद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार होते तर मग भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड या कंपनीने आधी पूर्वनियोजन करणे अपेक्षित होते. मात्र कुठलेही नियोजन केले नाही. २२ कर्मचाºयांचे काम तालुकाभरात विस्तारलेले कंपनीचे जाळे चार कर्मचारी कसे सांभाळतील, असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. भारत दूरसंचार कंपनी आता कसे नियोजन करते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.