जामनेरला नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:53 PM2020-04-01T16:53:50+5:302020-04-01T16:55:18+5:30
जामनेर , जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास ...
जामनेर, जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र प्रशासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी गर्दी न करण्याचे सांगितले जात असुनही रस्त्यावरील नागरीकांची वर्दळ काही कमी होत नाही ही चिंतेची बाब आहे.
लॉकडाऊन काळात दररोज ठरावीक काळात भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू असतात. तरीही नागरिक मोठ्या संखेने सामाजिक हिताचा विचार न करता ये-जा करताना दिसतात.
ग्राहकांसह व्यावसायिकांनीदेखील सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणे गरजेचे असताना भाजी विक्रेते एकाच ठिकाणी दाटीदाटीने बसतात हे टाळता आले पाहिजे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात भीतीपोटी दूध वाटप करणारे व भाजी विक्रेते जात नाही. वेगळ्या नजरेतून पाहिले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे.
पालिका, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला सहकार्य करून नागरिकांनी येत्या काळात घरातच राहूुन आपली व सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे.
पालिकेकडून सर्वेक्षण
दरम्यान, पालिकेने व्हॉट्सएपच्या माध्यमातून कोरोनाबाबत कुटुंबाकडून माहिती घेतली जात आहे. यात कुणी बाहेरगावाहून अथवा बाहेरदेशाहून आलेला असल्यास त्याच्यासंबंधीचा तपशील मागितला आहे. ही माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये व गरज नसताना रस्त्यावर दुचाकीवरून फिरणे टाळावे.
-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर