जामनेर शाळा आॅफलाईन अन् विद्यार्थी आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 02:50 PM2020-04-26T14:50:46+5:302020-04-26T14:50:59+5:30
कोरोनाच्या संकटाने शाळा शिकण्यांपासून दूर राहिलेल्या मुलांच्या आयुष्यात आॅनलाइन शिक्षणाने रंग भरले आहेत.
(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)
जामनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या संकटाने शाळा शिकण्यांपासून दूर राहिलेल्या मुलांच्या आयुष्यात आॅनलाइन शिक्षणाने रंग भरले आहेत. शहरी भागात व ग्रामीण भागातील अनेक इंग्रजी, मराठी शाळांनी आॅनलाइन शिक्षण पद्धतीच्या अवलंब सुरू केला आहे. अनेक संस्थांनीही चित्रकला, निबंध, होमवर्क व अन्य स्पर्धांचे आयोजन केले आहे.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला जावा म्हणून शक्य तेवढे प्रयत्न करायचे म्हणून शाळांनी पावले उचलली आहेत. आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब संस्थांनी व जिल्हा परिषद शाळांनी सुरू केला आहे मोबाईल, संगणकावरून व्हाट्सअप, व्हिडीओ कॉलिंग करून मुलांना पुढील शैक्षणिक वर्षातील धडे दिले जात आहेत. सुटीतील अभ्यासही सांगितला जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहणे , मोबाईल गेम, कॅरम, खेळण्यात गुंग न राहाता अभ्यासात सातत्य ठेवावे यासाठी लोर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, जिनियस इंटरनॅशनल स्कूल, बोहरा सेंट्रल स्कूल, जिक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कूल व तालुक्यातील जि. प. मराठी, उर्दू शाळांनी पुढाकार घेतला आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात असून तयार केलेल्या अभ्यासाची नियमित तपासणी केली जात आह.े कोरोनामुळे शाळा जरी आॅफलाईन झाल्या तरी विद्यार्थी मात्र आॅनलाईन अभ्यासात व्यस्त असल्याचे अनोखे चित्र पाहला मिळत आहे.
एमएससीईआरटीतर्फे आॅनलाइन धडे
आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फेही ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांचा दररोज आॅनलाईन अभ्यास घेतला जात आहे. यासाठी एका लिंकद्वारे प्रत्येक वगार्चा दर दिवशी एका विषयाचा पाठ्यक्रम शिकविला जात आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थी पाठ्यपुस्तकासह मोबाईलवरही आॅनलाइन धडे घेण्यात रमून गेल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. यासाठी शाळांनी तयार केलेल्या विद्यार्थी पलक शिक्षक व्हॉट्सअप ग्रुपचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होत आहे.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरून व जिल्हास्तरावरून डाएटकडून दररोजचा इयत्तानिहाय व विषयनिहाय आॅनलाईन अभ्यासक्रम संबंधित सर्व शिक्षकांपर्यंत व्हॉट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला जात आहे. दर शनिवारी या अभ्यासक्रमाची चाचणी घेण्यात येते. यातील विद्यार्थी व पालकांचा सकारात्मक सहभाग दिसून येत आहे. यात सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणा काम करीत आहे.
विजय सरोदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, जामनेर