उपसा योजना रेंगाळल्याने जामनेर तालुका तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:04+5:302021-06-23T04:12:04+5:30
जामनेर : जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्याला लाभदायक ठरलेल्या वाघूर धरणातील पाणीसाठा जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाघूर नदीच्या ...
जामनेर : जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्याला लाभदायक ठरलेल्या वाघूर धरणातील पाणीसाठा जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाघूर नदीच्या प्रवाहामुळे कायम आहे. असे असले तरी वाघूरच्या पाण्यापासून शेंदुर्णी, पहूर येथील ग्रामस्थ वंचित राहिले आहे. वाघूर वरील उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेतून उगम पावणारी वाघूर नदी वाकोद, पहूर, नेरी परिसरातून वाहते. तालुक्यातील गाव शिवावरून वाघूर वाहत असली तरी या नदीकाठावरील गावांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पंधरा वर्षांपूर्वी नेरी व परिसरातील सात गावांसाठी संयुक्त पाणीपुरवठा योजना सुरु होती. योजनेतील गावांपर्यंत पाणी पोहोचविणारी जलवाहिनी कालबाह्य झाल्याने व काही गावांनी वीज बिल न भरल्याने योजना बंद पडली.
नेरीची योजना अपूर्णच
नेरीसाठी वाघूरवरून स्वतंत्र योजना आणण्यात आली. भूमिपूजन होऊन काही काम सुरु झाले, मात्र योजना अपूर्ण आहे. याचा फटका बसून भाजपला ग्रामपंचायतीची सत्ता गमवावी लागली.
वाकोद व पहूर गाव वाघूर नदीच्या काठावर असले तरी पाणी टंचाई पाचवीलाच पूजलेली आहे. मध्यंतरी आमदार गिरीश महाजन यांनी शेंदुर्णी व पहूरसाठी वाघूरवरून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करवून घेतली होती. राज्यातील सत्तांतरानंतर योजनेचे काम थंड बस्त्यात पडले आहे. शेंदुर्णी पाणी पुरवठा योजनेला शासनाने तत्वतः मान्यता दिलेली आहे. शासन बदलल्यानंतर निधीअभावी काम रखडले. आमदार गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून योजनेला निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनेमुळे शेंदुर्णीचा पाणी प्रश्न सुटेल, असे येथील भाजप नेते गोविंद अग्रवाल यांनी सांगितले.
शेंदुर्णी व पहूर येथील पाणी पुरवठा योजनेचे काम पाटबंधारे विभागाचे नसून केवळ पाणी आरक्षण करणे आहे. योजनेच्या कामाशी पाटबंधारे विभागाचा संबंध नाही.
- सी.के.पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग
--------
उपसा सिंचन योजना रखडली
वाघूर धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविणारी उपसा सिंचन योजना असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे १२० कोटीच्या निधी अभावी काम थांबले आहे. योजनेचा लाभ सुमारे ३० गावातील शेतकऱ्यांना होईल. २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाने निधी देणे गरजेचे आहे.
फोटो कॅप्शन
जामनेर उपसा सिंचन योजनेतंर्गत झालेले विद्युतीकरणाचे काम व उपलब्ध यंत्र सामुग्री फोटो नंबर - २३/८/९