सोशल मीडियातील वादविवादाने जामनेरचा सलोखा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:25 PM2020-02-02T15:25:24+5:302020-02-02T15:26:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे.
जामनेर, जि.जळगाव : गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे. तरुणांमधील वाढती गुंडगिरी, सोशल मीडियातून परस्परावर केले जाणारे आरोप, प्रत्यारोप व त्यातून निर्माण होत असलेली कटूता कायदा सुव्यवस्था धोक्यात आणू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत.
नागरिकत्व कायद्याला विरोध, समर्थन, बंद यावर सोशल मीडियातून परस्परांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. गेल्या आठवड्यात महाविद्यालयीन तरुणांनी घातलेला धुडगूस व त्यातून झालेली हाणामारीची घटना शैक्षणिक वातावरण गढूळ करणारी आहे. विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र यावेळेस पोलिसांनी केलेल्या कारवाईने अशा प्रकारांना आला बसेल, असे बोलले जात आहे.
फेसबुकवर एका तरुणाने नुकत्याच टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे इतर तरुणांनी त्याला जाब विचारला. यातून निर्माण झालेला वाद सामाजिक सलोखा बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकतो. या प्रकाराने संतापलेल्या तरुणाच्या गटाने शुक्रवारी पालिका कार्यालयापासून पोलीस ठाण्यावर जात निवेदन दिले. या तरुणांच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या होत्या.
सामाजिक सलोख्याला बाधा
घडत असलेल्या घटना सामाजिक सलोखा बिघडविण्यास सहाय्यभूत ठरू शकत असल्याने प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ बंदच्या दिवशी दुपारी गांधी चौक परिसरातील घटना शांततेला बाधा आणणारी ठरू शकली असती, पोलिसांनी वेळीच दाखल घेतल्याने अनर्थ टळला.
भरधाव वेगाने ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या युवकांमुळे पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी गांधी चौकातून बाजार परिसरात दुचाकी व वाहनांना बंदीची मागणी होत असून, याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. गांधी चौक व पालिका चौकात वाहतूक नियंत्रणासाठी नियमित पोलिसाच्या नियुक्तीची मागणी आहे.