जामनेरला कोरडवाहू पिकांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:44+5:302021-07-08T04:12:44+5:30
जामनेर : पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या ...
जामनेर : पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या केलेल्यांना पुन्हा पेरणी करावी लागेल, अशी शक्यता आहे. तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यातील सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनीही चिंता वाढली आहे.
बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकचा आधार असल्याने ते टिकून आहे. तालुक्यात सुमारे ७५ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, पावसाच्या पाण्यावरचा त्यांची भिस्त असते. महागडे बियाणे खरेदी करून, केलेल्या पेरण्या वाया जात असल्याने शेतकरी खचला आहे. वाढलेल्या तापमानाने पिके कोमेजू लागली आहेत. कापूस, मका, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. पेरणीसाठी सोसायटीकडून घेतलेले कर्ज, सावकाराचे कर्ज, त्यावरचे व्याज कसे फेडावे, ही चिंता लागून असल्याचे शेतकरी सांगतात.
शासनाने आता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी होत आहे. दुष्काळसदृश्य स्थितीची पाहणी कृषी विभागाने करून पंचनामे करावेत व शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.