जामनेरला भुसावळ रस्त्यावर होणार टेक्सटाईल पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:31+5:302021-02-05T05:50:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेरच्या टेक्सटाईल पार्क होणार या घोषणेला वर्षे उलटली तरी अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जामनेरच्या टेक्सटाईल पार्क होणार या घोषणेला वर्षे उलटली तरी अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात होत नव्हती. अखेर काही दिवसांपासून जामनेर तालुक्यातील भुसावळ रस्त्यावरील गारखेडा आणि होळ हवेली या गावांमध्ये जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या मुंबईतील मुख्यालयात संमती करार तयार करण्याचे काम सुरू आहे.
जळगाव आणि आसपासच्या परिसरात होणाऱ्या कापूस उत्पादनाचा विचार करता या भागात वस्त्रोद्योगाशी संबंधित संधी आहे. त्यानुसारच केंद्र सरकारने जामनेरला टेक्सटाईल पार्कची घोषणा केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या टेक्सटाईल पार्कच्या कामाला वेग काही मिळत नव्हता. मात्र अखेर एमआयडीसीने या भागात भूसंपादनाला सुरुवात केली आहे. गारखेडा, होळहवेली या भागातील जमिनीच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी संमती करार करण्याचे काम एमआयडीसीच्या मुंबईतील मुख्यालयात सुरू आहे. जामनेरला या जागेवर एमआयडीसी कार्यालयाने एक फलकदेखील लावला असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र ही जागा नेमकी किती आहे आणि त्यासाठी किती शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार, त्यांना किती मोबदला मिळणार, त्यासाठीच्या अटी आणि शर्ती काय आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
राज्यात भाजपचे सरकार असताना या कामाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही पावले उचलली गेली नव्हती. अखेर काही दिवस आधी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यासाठी जामनेरला जागेची पाहणी केली.
शासकीय जागाच नाही
जामनेरला शासकीय जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे टेक्सटाईल पार्कच्या जागेचा प्रश्न होता. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.