जामनेरची उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:50+5:302021-06-01T04:12:50+5:30

जामनेर : राज्यातील सत्ताबदलानंतर त्याचा मोठा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. युती शासन काळात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन ...

Jamner's upsa irrigation scheme stalled due to lack of funds | जामनेरची उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली

जामनेरची उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली

Next

जामनेर : राज्यातील सत्ताबदलानंतर त्याचा मोठा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. युती शासन काळात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी वाघूर धरणावरील उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील कामास निधी मिळविण्याचा प्रयत्न केला व तो काही प्रमाणात मिळाल्याने काम मार्गी लागले. मात्र आता सरकारने हा निधी रोखून धरल्याने काम बंद पडले आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार महाजन जलसंपदा मंत्री असताना उपसा सिंचन योजना क्रमांक १ साठी ४०७ व क्रमांक २ साठी २९२ कोटीची तरतूद २०१९ मध्ये करण्यात आली होती. सिंचन योजना १ अंतर्गत १० हजार १०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून, याचा फायदा २९ गावांना मिळेल. जलाशयाच्या उजव्या बाजूस असलेल्या योजनेची कामे प्रगतीत असून पंपगृह, ऊर्ध्वगामी नलिका, वितरण कुंड, विद्युतीकरणची कामे पूर्ण झाली आहेत. गुरुत्वीय मालिकेचे व चेक आऊटलेटची कामे अंतिम टप्प्यात आहेत. योजनेची राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५५.१४ कोटीची आवश्यकता आहे. चेक आऊटलेट ते शेततळे यांना जोडणाऱ्या नलिकेसाठी ७० कोटीची आवश्यकता आहे. निधीची तरतूद झालेली असली तरी शासनाने निधी वितरण न केल्याने कामे होऊ शकत नाही.

२० गावांना मिळणार लाभ

उपसा सिंचन योजना क्रमांक २ अंतर्गत ९ हजार ३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्याचा सुमारे २० गावांना लाभ मिळेल. योजनेची निविदा अद्याप निघाली नाही. यासाठी २९२ कोटीची तरतूद झालेली आहे. मात्र निधीच नसल्याने कामाला सुरुवात होऊ शकली नाही.

----कोट

तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टर शेतीला थेट जलवाहिनीने पाणी पुरवठा करणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. योजनेच्या राहिलेल्या कामांसाठी शासनाने १२५ कोटींचा निधी दिल्यास अर्ध्या तालुक्यातील गावांना याचा लाभ मिळेल. निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

- गिरीश महाजन, माजी पालकमंत्री व आमदार जामनेर

------- या गावांना होईल फायदा

योजनेचा गाडेगाव, चिंचखेडे, नेरी बुद्रुक, करमाड, नेरी दिगर, पळासखेडे मिराचे, पळासखेडे बुद्रुक, गोंडखेल, माळपिंप्री, पाळधी, देवपिंप्री, टाकळी बुद्रुक, लहासर, ओझर, गाडेगाव, चिंचखेडे, हिवरखेड, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, केकतनिंभोरा, हिंगणे नेर कसबे, टाकरखेडे, आंबिलहोळ, खादगाव, गारखेडे बुद्रुक, महुखेडे गारखेडे खुर्द, डोहरी, ओझर बुद्रुक, अंबिलहोळ देवीचे गावांना फायदा होईल.

Web Title: Jamner's upsa irrigation scheme stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.