जनआरोग्य योजनेत सरसकट सर्वांना मिळेल आरोग्य सेवा -डॉ़ गोपाल जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:53 PM2020-06-14T12:53:11+5:302020-06-14T12:53:45+5:30
तक्रार असल्यास आरोग्य मित्रांना सांगा
आनंद सुरवाडे
जळगाव : जिल्हा रुग्णालय कोविड केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयही काही प्रमाणात कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आले़ अशा स्थितीत जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरसकट मोफत उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे़ सद्यस्थितीत अडचणी नाहीत, मात्र, रुग्णांना तरीही काही अडचणी असल्यास आरोग्य मित्रांना भेटा, तक्रार करा तात्काळ त्याचे निरसन होईल, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ़ गोपाल जोशी यांनी दिली़
जिल्ह्यातील सरसकरट सर्वांना या योजनेत खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या उपचाराची सेवा मोफत उपलब्ध आहे़ याविषयी त्यांनी लोकमत विशेष मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.
प्रश्न : महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?
डॉ़ जोशी : जिल्ह्यातील ३४ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत़ त्यापैकी पाच शासकीय असून २९ रुग्णालये ही खासगी आहेत़ त्यात कोविडचे रुग्ण वाढल्यामुळे काही खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. त्यात गणपती हॉस्पीटलचा समावेश आहे. गोदावरी रुग्णालयाचे ४०० बेड कोविडसाठी राखीव आहेत तर ३५० बेड हे योजनेतील रूग्णांवर उपचारसाठी आहेत़ शिवाय जिल्हा रुग्णालय पूर्णत: कोविड आहे़
प्रश्न : या योजनेत नेमके बदल काय झाले आहेत?
डॉ़ जोशी : या योजनेत आता प्रामुख्याने एक बदल म्हणजे तुमच्याकडे कोणतीही शिधापत्रिका असो. ती पांढरी असो वा केसरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. जरी तुमच्याकडे शिधापत्रिका नसली तरी तहसीलदारांच्या पत्रानुसार तुम्हाला या योजनेतील रुग्णालयात उपचाराची सेवा मिळणार आहे़ यात १२० आजार असे आहेत जे आधी केवळ शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचारांची परवानगी होती. या योजनेअंतर्गत, मात्र, आता या १२० आजारांवर खासगीतही उपचाराची परवानगी देण्यात आली आहे़ या व्यतीरिक्त प्रमुख बदल म्हणजे प्रसुती किंवा सिझेरीयन या योजनेत समाविष्ट कधीच नव्हते, यासारखे ६७ आजार ३१ जुलैपर्यंत या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
उपचार न मिळाल्यास नागरिकांनी काय करावे?
डॉ़ जोशी : जे ९९६ व नवीन ६७ असे आजार योजनेत समाविष्ट आहेत ते जर योजनेच्या रुग्णालयात मिळत नसतील तर अशा प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे़ रुग्णांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा, किंवा टोल फ्रि क्रमांकावर कळवावे, आमच्याकडून तातडीने शंकाचे निरसन केले जाते़ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी तीन वेळा खासगी डॉक्टर्ससोबत बैठक घेतलेली आहे़ प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालाच पाहिजे, रुग्ण नाकारू नका अशा सक्त सूचना त्यांनी दिलेल्या आहेत़ त्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व सर्वांना आरोग्य सेवा पूर्ण व वेळेवर मिळण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे़
जिल्ह्यातील सरसकरट सर्वांना या योजनेत खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या उपचाराची सेवा मोफत उपलब्ध आहे़ जिल्ह्यात यासाठी ३३ खाजगी रुग्णालयात या उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पांढरी अथवा केसरी असली तरी योजनेचा लाभ घेता येईल. शिधापत्रिका नसली तरी तहसीलदारांच्या पत्रानुसार या योजनेतील रुग्णालयात उपचाराची सेवा मिळणार आहे़
-डॉ़ गोपाल जोशी, जिल्हा समन्वयक, म.फुले जनआरोग्य योजना