एका जनार्दनी शिव हा भजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:48 AM2019-03-04T00:48:20+5:302019-03-04T00:48:47+5:30

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।। तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण ...

A Janardini Shiva is worshiped | एका जनार्दनी शिव हा भजावा

एका जनार्दनी शिव हा भजावा

Next

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।।
तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळो वेळा
सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती । पहाता ती मूर्ती शंकराची ।।
एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरूप ।।
-संत एकनाथ.
माघ महिन्यातील शिवरात्र येऊ लागली की घरातील मोठी माणसं शिवलिलामृत काशीखंड आदी ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नम: शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्री पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंग किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जुन भेट देतात.
ह्या पवित्र दिवशी शिव शंकराला रूद्राभिषेक करणे, जप करणे, बेलपत्र वाहणे, उपवास करणे आदी गोष्टी आवर्जुन केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला उत्कर्ष, मुक्ती आणि विकासाचा मार्ग सापडतो.
शिव उपासनेमुळे माणसाच्या प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो. ह्याबद्दल शिवलिलामृतमध्ये एक कथा आहे.
एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकारीसाठी जंगलात गेला. जलाशयानजीकच्या वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी एखादे सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. पण... दिवस गेला, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आलाही नाही. पण शिकार मिळाली ही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथं आली. पारधी आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म. तू आम्हाला मारणार हेही खरे आहे; पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो.
आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार कशी जाऊ द्यायची; पण त्या हरणाच्या प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला ‘‘ठिक आहे उद्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.’’ हरिणाच्या कळपाने ते मान्य केलं आणि कळप तिथून निघून गेला. आता रात्र कशी काढायची या विचारात त्याला दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नम: शिवायचा गजर सुरु होता. पारध्याला नकळत नाममंत्राची गोडी लागली. ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरण आले आणि म्हणाले, ‘पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंबप्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार..’ इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, ‘त्याला नको मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे.’ तेवढ्यात त्याची पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई-वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांचं रक्षण करू दे.
एकापाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपण धर्म पाळत आहे. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वांनाच जीवदान दिले. यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ‘ॐ नम: शिवाय’.
- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम ता. धरणगाव.

Web Title: A Janardini Shiva is worshiped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव