चाळीसगाव येथे बुधवारी ‘जनसेवक’ सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 07:53 PM2019-01-07T19:53:40+5:302019-01-07T19:55:05+5:30
राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यात राजकीय, सहकार, शिक्षण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाºया लोकप्रतिनिधींना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
सन्मान सोहळा ९ रोजी सकाळी ११ वाजता राजपुत लोकमंगल कार्यालयात होईल.
कै.देशमुख यांच्यासह तालुक्याच्या जडणघडणीत व गेल्या ५० वर्षात विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार व्हावा, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनीही यावेळी दिली.
तालुक्यातील सहकारी, शैक्षणिक संस्था मध्ये १९७० पासून कार्यरत असलेल्या विविध संस्थांमधील पदाधिकारी राहून आपले योगदान दिलेल्या आजी-माजी संचालक, सभापती, उपसभापती यांचा सन्मान करून त्यांचे आजपर्यंतचे योगदान सामाजापुढे ठेवण्याचा मानस हा सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलगंगा सहकारी साखर कारखाना, नगरपालिका, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक संस्था, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी यासारख्या संस्थांमध्ये काम केलेला सदस्यांचा सहभाग असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी असतील तर माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री तथा पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील ,माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, पाचोºयाचे माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, पंचायत समितीचे गटनेते अजय पाटील, जिभाऊ पाटील, लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, जि. प. सदस्य अतुल देशमुख, भूषण पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष स्वप्नील कोतकर , प्रताप भोसले, सुधीर पाटील, यज्ञेश बाविस्कर, मिलिंद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी आभार मानले.