जानेवारी महिन्यात ११ वर्षांनंतर कमाल तापमान ३४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:32+5:302021-01-20T04:16:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, याचा परिणाम आता जाणवू लागले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, याचा परिणाम आता जाणवू लागले आहेत. यंदा थंडी केवळ नावालाच पडली आहे. आता जानेवारी महिन्यातच कमाल तापमान झपाट्याने वाढत असून, गेल्या ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात कमाल तापमान ३४ अंशावर पोहचले आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात नेहमी थंडीचा कडाका असतो. मात्र, यावर्षी थंडी नसल्याने तापमानात वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून पारा ३४ अंशावर कायम आहे. तर किमान तापमानाची सरासरी देखील जानेवारी महिन्यात १८ अंश इतकी राहिली आहे.
थंडी गायब झाल्याने यंदा रब्बी हंगामावर देखील परिणाम होत असून, गव्हाची वाढ खुंटली आहे. तसेच सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, मका, दादर या पीकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच यंदा कापसाच्या फरदडच्या उत्पन्नात देखील वाढ झालेली नाही. दरम्यान, थंडीत घट झाल्याने परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांवर परिणाम झाला आहे. यासह थंडी नसल्याने स्वेटर विक्रीवर देखील परिणाम झाला आहे.
येत्या दोन दिवसात तापमानात होणार घट
यंदा जानेवारी महिन्यात थंडी गायबच राहिली आहे. सुरुवातीला राजस्थान भागात निर्माण झालेल्या पश्चिमी विक्षोभमुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आता पुन्हा अरबी समुद्र व बंगालचा उपसागराकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा रस्ता अडवला आहे. यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, येत्या दोन दिवसात उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रीय होणार असून, तापमानात घट होवून, थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
कोट...
तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पावसाळ्याचे प्रमाण वाढत आहे तर थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. हा सर्व परिणाम वातावरणात बदल होत असल्याने होत आहे. हा बदल केवळ जळगाव जिल्ह्यापुरताच होत नसून, संपुर्ण जगात याचा परिणाम होत आहे.
- प्रणिल चौधरी, संचालक, योगी संस्था
जागतिक वातावरणात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम आहे. समुद्राच्या तापमानत होणारी वाढ, त्यामुळे निर्माण होणारी वादळे यामुळे थंडी आता गायबच आहे, हे प्रकार आता सातत्याने होण्याची शक्यता असून, यामुळे थंडीचे प्रमाण घटले आहे.
-नीलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर
गेल्या १० वर्षांचे जानेवारी महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान
२०१० - ३२ - १३ जानेवारी
२०११ - ३१.२ - ३१ जानेवारी
२०१२ - ३२.३ - २९ जानेवारी
२०१३ - ३२.४ - २१ जानेवारी
२०१४ - ३२.७ - २३ जानेवारी
२०१५ - ३३.१ - २३ ते २५ जानेवारी
२०१६ - ३१.३ - २७ जानेवारी
२०१७ - ३० - ३ ते ९ जानेवारी
२०१८ - ३१ - ३० जानेवारी
२०१९ - ३१ - २७ जानेवारी
२०२० - ३२.५ - २९ जानेवारी