जानेवारी महिन्यात ११ वर्षांनंतर कमाल तापमान ३४ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:14+5:302021-01-25T04:17:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, त्याचे परिणाम आता ...

January maximum temperature at 34 degrees after 11 years | जानेवारी महिन्यात ११ वर्षांनंतर कमाल तापमान ३४ अंशांवर

जानेवारी महिन्यात ११ वर्षांनंतर कमाल तापमान ३४ अंशांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. यंदा थंडी केवळ नावालाच पडली आहे. आता जानेवारी महिन्यातच कमाल तापमान झपाट्याने वाढत आहे. गेल्या ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात कमाल तापमान ३४ अंशावर पोहोचले आहे. १९ जानेवारी शहराचे तापमान ३४ अंशापर्यंत पोहोचले होते. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात नेहमी थंडीचा कडाका असतो. मात्र, यावर्षी थंडी नसल्याने तापमानात वाढ झाली आहे. थंडी केवळ नावालाच आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात किमान तापमानाची सरासरी ही नेहमी १३ अंश राहिली होती. यंदा किमान तापमानाची सरासरीदेखील जानेवारी महिन्यात १८ अंश इतकी राहिली आहे.

थंडी गायब झाल्याने यंदा रब्बी हंगामावरदेखील परिणाम होत असून, गव्हाची वाढ खुंटली आहे. तसेच सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, मका, दादर या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच यंदा कापसाच्या फरदडच्या उत्पन्नातदेखील वाढ झालेली नाही. दरम्यान, थंडीत घट झाल्याने परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांवर परिणाम झाला आहे. यासह थंडी नसल्याने स्वेटर विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे.

येत्या दोन दिवसात तापमानात होणार घट

यंदा जानेवारी महिन्यात थंडी गायबच राहिली आहे. सुरुवातीला राजस्थान भागात निर्माण झालेल्या पश्चिमी विक्षोभमुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर आता पुन्हा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा रस्ता अडवला आहे. यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, येत्या दोन दिवसात उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय होणार असून, तापमानात घट होऊन, थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

कोट...

तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पावसाळ्याचे प्रमाण वाढत आहे, तर थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. हा सर्व परिणाम वातावरणात बदल होत असल्याने होत आहे. हा बदल केवळ जळगाव जिल्ह्यापुरताच होत नसून, संपूर्ण जगात याचा परिणाम होत आहे.

- प्रणिल चौधरी, संचालक, योगी संस्था

जागतिक वातावरणात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम आहे. समुद्राच्या तापमानात होणारी वाढ, त्यामुळे निर्माण होणारी वादळे यामुळे थंडी आता गायबच आहे, हे प्रकार आता सातत्याने होण्याची शक्यता असून, यामुळे थंडीचे प्रमाण घटले आहे.

-नीलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर

गेल्या दहा वर्षांचे जानेवारी महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान

२०१०- ३२ - १३ जानेवारी

२०११ - ३१.२ - ३१ जानेवारी

२०१२ - ३२.३ - २९ जानेवारी

२०१३ - ३२.४ - २१ जानेवारी

२०१४ - ३२.७ - २३ जानेवारी

२०१५ - ३३.१ - २३ ते २५ जानेवारी

२०१६ - ३१.३ - २७ जानेवारी

२०१७ - ३० - ३ ते ९ जानेवारी

२०१८ - ३१ - ३० जानेवारी

२०१९ - ३१ - २७ जानेवारी

२०२० - ३२.५ - २९ जानेवारी

२०२१ - ३४ - १९ जानेवारी

Web Title: January maximum temperature at 34 degrees after 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.