जानवे शाळेला ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:27+5:302021-08-12T04:20:27+5:30

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. ...

Janve school was locked by the gram panchayat | जानवे शाळेला ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप

जानवे शाळेला ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप

googlenewsNext

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. २००३साली इमारत २०२५पर्यंत भाडे तत्वावर कराराने वापरण्यास दिली आहे. सध्या ती इमारत जीर्ण झाली असून ती वापरण्यायोग्य नसल्याने सरपंच यांनी १९ जुलै रोजी सदर इमारत आठ दिवसात खाली करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार आज ग्रामपंचायतीने या इमारतीला कुलूप ठोकले, त्यामुळे आता शाळा कुठे भरावयाची हा मुख्याध्यापकापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून भाडे ठरवले होते. त्यामुळे शाळा इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. मात्र ग्रामपंचायतीने गावातील मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नाही आणि इमारतही दुरुस्त केली नाही.

सुभाष भिला पाटील यांनी २०१३पासून या शाळेची इमारत ही जीर्ण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती. यापूर्वीदेखील २०१७ मध्ये आर. बी. पवार मुख्याध्यापक असताना ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्याने तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत कुलूप उघडले होते. त्यानंतर सुभाष पाटील यांनी जीर्ण इमारतीबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला. आता पाटील यांनी या जीर्ण इमारतीत वर्ग भरवणे धोक्याचे असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाकडून मिळवल्याने आज सरपंच विजय सोनवणे, मनोज पाटील, सुभाष पाटील आणि शरद पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने कुलूप ठोकले. त्यामुळे शाळा कुठे भरावयाची हा यक्षप्रश्न आता प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

दरम्यान शाळेच्या इमारतीसाठी धुळे रस्त्यालगत महावितरणच्या उपकेंद्राजवळ साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे. त्यावर शिक्षकांनी बांधकाम सुरू केले होते. मात्र शेजारील शेतकऱ्याने अडथळा आणल्याने बांधकाम अर्धवट पडून आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी याबाबत आपण संस्था चालकांना कळवले असून माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देखील कळविले आहे. उद्या प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षणाधिकारी यांची आणि संस्था चालकांची भेट घेणार आहेत, असे सांगितले.

दरम्यान किसान महाविद्यालयात ५ ते १२वीपर्यंतचे वर्ग असून ग्रामपंचायतीच्या सहा खोल्या शाळेला भाडेतत्वावर दिल्या आहेत. गावातीलच गरिबांचे सुमारे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण या शाळेत घेत आहेत.

शाळेने इमारत भाडे भरलेले नाही आणि इमारत जीर्ण झाली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती खाली करणे गरजेचे होते म्हणून ती खाली करण्यात आली.

-के. आर. देसले, ग्रामसेवक, जानवे, ता. अमळनेर

Web Title: Janve school was locked by the gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.