सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 05:54 PM2021-01-28T17:54:58+5:302021-01-28T17:55:29+5:30
सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही करूण अंत झाल्याची घटना खेडगाव येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खेडगाव, ता. भडगाव : येथील शिवाजी त्रंबक सैंदाणे (६३) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शिर्डी येथून आलेले जावई सतिश आत्माराम अहिरे ( ३५) यांनाही गुरुवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले असताना उपचारार्थ चाळीसगाव व तेथून शिर्डी येथे नेत असताना वाटेवर मृत्यू झाला.
या कुंटुंबातील एकलुत्या एक तुकाराम नामक तरुण मुलाचाही दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मृत्यूच्या या मालिकेने सैंदाणे कुंटुंबात वृध्द आजी, १२ वर्षाचा नातू व तीन वर्षाची नात असे कुंटुंब आधारहीन झाले आहे. आईपाठोपाठ मुलीचाही कुंकवाचा धनी गेल्याने खेडगावात हळहळ व्यक्त होत आहे.
अखेरचा भेरवादक विसावला
शिवाजी सैंदाणे यांच्या मृत्यूने कुंटुंबाप्रमाणेच गावानेही तुतारीसम गगनभेदी व अंगावर रोमांच उभे करणाऱ्या आवाजात भेर फुकणारा कलावंत व भजनी मंडळातील वारकरी गमावला आहे. मागील काही महिन्यापासुन ते आजारी होते. तीन-चार लाखांवर खर्च करुनही उपचाराला शरीराची साथ न मिळाल्याने त्यांचे अखेर निधन झाले. विवाह, जाऊळ, दशक्रियाविधी यानिमित्ताने गावातील घराघरात परिचित अशा व्यक्तीची आजच गावाला उणीव निर्माण झाली आहे.
दुर्दैव पाठ सोडेना
सैंदाणे यांची अंत्ययात्रा गुरुवारी १० वाजता ठेवण्यात आली होती. सैंदाणे यांचे लहान जावई व लहान मुलगी शोभाभाई यांचे पती मुळचे पिंपरखेड परंतु नाभिक व्यवसायासाठी शिर्डी येथे स्थायिक झाले होते. सतीश अहिरे हे खेडगावी आले असता, त्यांनाही मृत्यू ओढवला. वडिलांची अंत्ययात्रा बाजूलाच राहिली. उलट दवाखान्यात पतीला नेत असताना, वाहनात पत्नी शोभाबाईसमोर पतीने घेतलेला शेवटचा श्वास काळीज भेदणारा होता. दुर्दैव येथेच संपले नाही. शिर्डी येथून अंत्ययात्रेसाठी खास वाहन करुन येणाऱ्या अहिरे यांच्या कुंटुंबालादेखील मुलाच्या वार्तेने परत माघारी फिरावे लागले. इकडे आधीच पतीच्या निधनाने दुःख सागरात बुडालेल्या जिजाबाईस जावयाच्या मृत्यूची बातमी कळू देण्यात आली नाही. या संपूर्ण घटनेत सैंदाणे यांचे शेजारी व भाऊबंद या निराधार कुंटुंबामागे खंबीरपणे उभे राहत सांत्वन व मदत करीत होते.