चाळीसगावचे जवान यश देशमुख काश्मिरात शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 10:27 PM2020-11-26T22:27:07+5:302020-11-26T22:29:19+5:30
काश्मिरमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील जवान यश दिगंबर देशमुख (वय २१) हे शहीद झाले.
चाळीसगाव जि. जळगाव : काश्मिरमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील जवान यश दिगंबर देशमुख (वय २१) हे शहीद झाले आहे. त्यांच्या वीर मरणाची वार्ता येथे येताच चाळीसगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. चाळीसगाव शहरापासून पश्चिमेला दहा किमी अंतरावरील रोहिणी गावाजवळील पिंपळगाव हे यश यांचे गाव. पावणेदोन वर्षापूर्वी ते बेळगाव येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले. तेथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यातील मराठा बटालियन (१०१ एटी) तुकडीत त्यांचा समावेश झाला. श्रीनगरजवळील शरीफाबाद येथे कर्तव्यावर असतांना दुपारी एक वाजता झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले.
घरातला कर्ता पुरुष
यश देशमुख हे त्यांच्या कुटूंबातील कर्ता पुरुष होता. त्यांचे वडिल दिगंबराव देशमुख हे पिंपळगाव येथेच शेती करतात. कर्ता पुरुष गमावल्याने कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. यश देशमुख यांना दोन बहिणी असून त्यांचे विवाह झाले आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षण घेणारा भाऊ पंकज देशमुख याच्यासह आई - वडिल आहेत.
'ती' ठरली अखेरची भेट
यश देशमुख सैन्यात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन महिन्यापूर्वी सप्टेंबर मध्ये पिंपळगावी आले होते. कुटूंबियांसोबतची ही त्यांची अखेरची भेट ठरल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.जवान यश यांचे पाथिर्व २८ रोजी रात्री अथवा २९ रोजी सकाळी चाळीसगाव येथे आणले जाईल, अशी माहिती मिळाली.