रेशनवर गव्हाऐवजी आली ज्वारी

By admin | Published: February 21, 2017 12:21 AM2017-02-21T00:21:38+5:302017-02-21T00:21:38+5:30

जामनेर तालुका : ग्राहकांना लाभ देण्याऐवजी दुसरीकडेच विल्हेवाट लावली जाण्याची होतेय चर्चा

Jawar instead of wheat on ration | रेशनवर गव्हाऐवजी आली ज्वारी

रेशनवर गव्हाऐवजी आली ज्वारी

Next

सैयद लियाकत  ल्ल जामनेर
 तालुक्यातील पावणेदोनशे स्वस्त धान्य दुकानांवर शासनाने गव्हाऐवजी तब्बल सव्वाचार हजार क्विंटल ज्वारी पाठवून दिली आहे, मात्र कार्डधारकांकडून तिला म्हणावा तसा उठाव नसल्याने या ज्वारीची दुसरीकडे विल्हेवाट लावली जाण्याची शक्यता  उघडपणे चर्चिली जात असून पुरवठा विभागाने दक्षता घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्वस्त धान्य  दुकानांमधून शिधापत्रिकेवर मिळणारा गहू सध्या दिसेनासा झाला आहे.   दरम्यान, गव्हाऐवजी शासनाने जनतेसाठी फक्त एक रुपया किलो दराने कार्डधारकाला देण्यासाठी ज्वारीचा पुरवठा केला आहे. तथापि ज्वारीला कोणीही विचारत नसल्याचा फायदा उचलून या ज्वारीचा काळाबाजार सुरू झाल्याची चर्चा तालुकाभरात सुरू झाली आहे.
स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा विभागाच्या साटय़ालोटय़ाची ब:याचदा चर्चा होत असते. अनेकदा जनतेला वेळेवर पुरेशा प्रमाणात धान्य दिले जात नाही. तर काही स्वस्त धान्य दुकानदार दुकानच उघडे ठेवत नाही, अशाही तक्रारींचा पाढा वाचला जातो. याबाबत अनेकदा तक्रारीदेखील केल्या जातात. परंतु नंतर पुढे त्याचे काहीच होत नाही, असा जनतेचा नेहमीचा अनुभव आहे. ही सर्व पाश्र्वभूमी असताना त्यात आता भर पडली आहे ती गव्हाच्या जागेवर स्वस्त धान्य दुकानातून ज्वारी विकण्याची. तालुक्यात आलेल्या या प्रचंड ज्वारीने या चर्चेला तोंड फोडले आहे.
ज्वारीला उचल नसल्याने घोटाळ्यालाच वाव?
दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसह  जनतेला शासनाकडून कार्डावर स्वस्त धान्य दुकानांमधून अत्यल्प किमतीमध्ये गहू मिळतो. महिन्याकाठी प्रत्येक कार्डाला सुमारे 35 किलो गव्हासह तांदूळ देण्यात येतो. आतार्पयत हा पुरवठा केला जात होता. मात्र  गेल्या महिन्यापासून तालुक्यात गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे, इकडे मात्र ज्वारी घेण्यास ग्राहक   तयार दिसत नाही. याचा गैरफायदा आता स्वस्त धान्य दुकानदार उचलत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
4 हजार 279 क्विंटल ज्वारीचा साठा !
तालुकाभरातील प्राधान्य यादीवरील कुटुंबांसाठी सुमारे 4 हजार 279 क्विंटल ज्वारीचा पुरवठा करण्यात आला आहे.  ही ज्वारी स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून  फक्त 30 पैसे प्रती किलोने वितरित केली जाते. तर ग्राहकाला     देण्यासाठी या ज्वारीचा दर शासनाने फक्त एक रुपये किलो असा ठेवला आहे. एवढय़ा कमी किमतीत ज्वारी मिळत असूनही, गव्हाची पोळी खाण्याची सवय लागलेली जनता मात्र ज्वारीच्या भाकरीकडे वळायला सहजासहजी तयार होताना दिसत नाहीय.
  दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदारालाही आवश्यक माल दुकानात भरण्याशिवाय पर्याय नाही, त्यातून हा वेगळाच घोळ सुरू झाला आहे. तालुकाभरात पावणेदोनशे स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या असून त्यातील अनेकांकडे दोन ते तीन दुकानांची मालकी असल्याच्याही तक्रारी ऐकायला मिळत आहे. तसेच दुकान वेळेवर न उघडणे, पुरेशा प्रमाणात ग्राहकांना धान्याचा पुरवठा न करणे, चालू महिन्यातील धान्य दुस:या महिन्यात ग्राहकांच्या माथी मारणे असे सर्रास प्रकार गेल्या अनेक वर्षापासून  सुरू असले तरी त्यावर आजही पुरवठा विभागाला ‘रामबाण’ उपाय शोधण्यात यश आलेले नाही. त्यात या प्रचंड प्रमाणावरील ज्वारीचे आगमन झाले आहे.
स्वस्त ज्वारीची काळयाबाजारात महागडय़ा दरात विक्री ?
स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून फक्त तीस पैसे किलो दराने ही ज्वारी दिली जाते, तर तीच ज्वारी जर काळ्याबाजारात विक्रीसाठी गेली तर त्या ज्वारीचा भाव चक्क एक हजार ते पंधराशे रुपये क्विंटलर्पयत जातो. त्यामुळे अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची तालुकाभरात सध्या चर्चा रंगली आहे. एक रुपया किलोने कार्डावर ज्वारी मिळत असल्याची माहिती अद्यापर्पयत अनेक गोरगरीब ग्राहकांनाही नसल्याचा दुहेरी फायदा सध्या दुकानदारांनी घेतल्याचे बोलले जात असून त्यांना आवर कोण घालणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत असाच आहे!         
या महिन्यात जिल्हाभरात गव्हाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झालेला नाही, त्याची भरपाई म्हणून ज्वारी पाठविण्यात आली. आलेली ज्वारी प्रत्येक दुकानदार घेत असून, ग्राहकालाही ज्वारी स्वस्त धान्य दुकानातून घ्यावीच लागेल. शासनाकडून आलेल्या ज्वारीचा नियमाप्रमाणे सर्वत्र पुरवठा करण्यात येत आहे.                                                                          -अतुल सानप
                                                                 पुरवठा निरीक्षक, जामनेर

Web Title: Jawar instead of wheat on ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.