जयोस्तुते, उषादेवते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:47 PM2017-09-24T15:47:36+5:302017-09-24T15:48:02+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमधील अॅड. सुशील अत्रे यांचा लेख
घटस्थापनेनंतरचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा उदो, उदो करण्याचे दिवस असतात. या दिवसांमध्ये दुर्गा मातेशिवाय अन्य कोणता विषय बघायला, ऐकायला, वाचायला क्वचितच मिळतो. सर्वसामान्यपणे कोणत्याही लोकप्रिय दैवतांविषयी एक दावा अगदी हमखास केला जातो, की ते दैवत सृष्टीच्या उगमापासूनच अस्तित्वात होते आणि सर्वापेक्षा जास्त प्रभावी होते. हा झाला श्रद्धेचा भाग. पण प्राचीन ग्रंथांमधल्या लिखित उल्लेखावरून एखाद्या देवाचा व देवीचा संदर्भ शोधता येतो. त्याआधारे त्या देवाचे संदर्भ किती प्राचीन आहेत हे श्रद्धा न बाळगणारे अभ्यासकसुद्धा ठरवू शकतील. अशा प्राचीन संदर्भाचा विचार केला तर अर्थातच सगळ्यात प्राचीन ग्रंथसंहिता आहे ऋग्वेद ! या विषयावर जसजसं अधिक संशोधन होतंय, तसतसा ऋग्वेदाचा काळ आणखीनच मागे सरकतोय. तर अशा या ऋग्वेदात उल्लेख असलेली एक अत्यंत ठळक देवी अथवा देवता म्हणजे उषादेवी. म्हणजे हिंदू धर्माचा किंवा परंपरांचा विचार केला तर सगळ्याच देवींची आद्यदेवता म्हणजे उषा देवता, असं म्हणायला हरकत नाही. ऋग्वेदाचा काळ हा नैसर्गिक शक्ती, नैसर्गिक घटनांना मोठय़ा काव्यात्मक पद्धतीने देवता स्वरुप देण्याचा काळ होता. त्या काळातल्या देवता मूर्ती रुपात नव्हत्या तर छंदोबद्ध वर्णन रुपात होत्या. त्यामुळे ‘उषा’ही देवी मूर्ती रुपात आढळून येणार नाही पण तिचं अगदी तपशीलवार वर्णन ऋग्वेदातल्या ऋचांमध्ये आहे. त्यानुसार उषा ही अत्यंत सुंदर, दागिन्यांची आभूषित, प्रफुल्ल चेह:याची अशी सुकुमार तरुणी आहे. ती 100 रथांवर आरुढ होवून येते ते रथ लाल, सोनेरी रंगांचे अश्व ओढतात. ती येते, ती अंधाराला दूर सारुन, अवघं आसंमत उजळीत येते. ती सूर्याचा मार्ग मोकळा करत. त्याच्या आगमनाची तयारी करते. उषा ही ‘द्यु:’ किंवा आकाश या देवाची मुलगी आहे. तिला एक बहीण आहे. तिचं नाव निशा अथव ‘रात्रि.’ या दोघी नेहमी एकमेकींचा पाठलाग करतात. हे अगदी असंच वर्णन उषेचं ऋग्वेदात ठिकठिकाणी आहे. पैकी चाळीस ऋचा तर केवळ उषा देवतेला समर्पित आहेत. त्याशिवाय इतर अनेक ऋचांमध्येही तिचा जागोजाग उल्लेख आहे. अगदी उघड आहे, की ‘उषा’ हे पहाटेचं देवतारुप आहे. पहाटेच्या वेळी सारी सृष्टी जशी दिसते. भासते तेच वर्णन उषेचं केलंय वेदकत्र्यानी. ऋग्वेदांतल्या तीन प्रमुख देवता म्हणजे इंद्र, अग्नी आणि सोम. हे तिघेही ‘पुरुष’ देव आहेत. त्यांच्या बरोबरीने महत्त्व असलेली ‘स्त्री’ देवता एकच आहे-उषा ! ऋग्वेदात उषेचा उल्लेख ‘उषस्’ असा आहे आणि गंमत बघा-ग्रीक पुराणांमध्ये हीच ‘पहाटेची देवी इओस’ या नावाने येते. पारशी किंवा अवेस्तन कथांमध्ये ती ‘उसा’ नावाने येते. लिथुअनियन पुराणात ती ‘औसरा’ नावाने येते, आणि रोमन पुराणात ती ‘अरोरा’ नावाने येते. म्हणजे नावातही किती सारखेपणा आहे, बघा. ग्रीक ‘इओस’ हीपण ‘अवकाश’ देवाची मुलगी आहे. तिला हेलिऑस म्हणजे सूर्य हा भाऊ आणि सेलेने म्हणजे चंद्रदेवता ही बहीण आहे. प्रसिद्ध ग्रीक महाकवी होमर याने आपल्या ‘इलियड’मध्ये या इओसचं वर्णन करताना ती केशरी रंगाच्या झग्यात येते असं म्हटलंय. शिवाय ग्रीक पुराणामध्ये तिचे तळवे आणि बोटं गुलाबाच्या फुलांप्रमाणे गुलाबी असल्याचं वर्णन आहे. हे सगळे रंग पहाटेच्या वेळी आकाशात दिसणारेच रंग आहेत. म्हणजे वैदीक ऋषींनाच नव्हे तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ग्रीक आणि रोमन पुराणकत्र्यानाही या ‘पहाट’ वेळेचं इतकं आकर्षण वाटलं, की त्यांनी ‘पहाटे’ला चक्क देवतास्वरुप करून टाकलं. रोज अंधाराचं राज्य संपवून काळ्या कथिन्न शक्तींवर मात करून प्रसन्न वातावरण सोबत घेऊन येणारी ‘उषा देवता’ ही सर्वच संस्कृतींमध्ये, सर्वच पुराणांमध्ये मोठय़ा मानाने वावरते. वेद काळातल्या सर्वच देवतांचं महत्त्व कालांतराने कमी झालं, देवतांना पुढे मूर्ती स्वरुपात प्रतिष्ठा मिळाली. या सर्व सांस्कृतिक उलथापालथीत उषा देवीचंही महत्त्व कमी झालं. यात आश्चर्य नाही पण ‘आद्य’ या शब्दाचं महत्त्व कधीच कमी होत नसतं. त्यामुळे आजच्या सर्व देवींची ‘आद्य देवी’ हा उषा देवीचा मान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ऋग्वेदातली उषासुक्ते आपल्याला हेच सांगतात की ‘उषा’ ही केवळ देवता नाही तर ते नैसर्गिक घटनांकडे कुतुहलाने आणि आदराने बघण्याचं मूर्त स्वरुप आहे. सुसंस्कृत मानवाने निसर्गाप्रती दाखवलेला तो काव्यमय आदर आहे. म्हणूनच नवरात्रींच्या सोहळ्यात दुर्गा मातेचीही जी माता, त्या उषा देवतेचंही स्मरण करू या- जयोस्तुते हे उषादेवते देवि दयावती महन्मंगले..