‘नेकी की दिवार’च्या नावाखाली कमाई करणाऱ्या दुकानांवर चालला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:26+5:302021-01-13T04:37:26+5:30

सर्व दुकाने तोडली : ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील जुन्या बी.जे.मार्केट परिसरात ...

JCB went to the grocery stores under the name 'Neki Ki Diwar' | ‘नेकी की दिवार’च्या नावाखाली कमाई करणाऱ्या दुकानांवर चालला जेसीबी

‘नेकी की दिवार’च्या नावाखाली कमाई करणाऱ्या दुकानांवर चालला जेसीबी

Next

सर्व दुकाने तोडली : ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील जुन्या बी.जे.मार्केट परिसरात ‘नेकी की दिवार’ च्या नावाखाली अवैधपणे दुकाने तयार करून सुरु केलेल्या कमाईच्या गोरखधंद्यावर सोमवारी अखेर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचा जेसीबी चालला. अवघ्या दहा मिनीटातच तिन्ही दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. नेकी की दिवारच्या नावावर सुरु झालेल्या कमाईच्या धंद्याचा प्रकार ‘लोकमत’ ने गेल्या आठवड्यात लक्षात आणला होता. ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने अतिक्रमीत तिन्ही दुकाने तोडून टाकली.

शहरात वर्षभरापुर्वी ‘नेकी की दिवार’ चा उपक्रम राबविण्यात आला होता. जुन्या बी.जे.मार्केटमधील पोलीस स्टेशनला लागून एका माजी नगरसेवकाने हा उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यानंतर याठिकाणची भिंत तोडून पत्र्याचे शेड तयार करून दोन दुकाने तयार करण्यात आली होती. दोन्ही दुकाने भाड्याने देवून त्या दुकानदारांकडून ८ हजार रुपये महिना भाडे देखील वसुल केले जात होते. हा प्रकार ‘लोकमत’ ने उघडकीस आणल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक याठिकाणी पोहचले. मनपाचे पथक पोहचल्यानंतर संबधित दुकानदारांनी माजी नगरसेवकांना बोलावून घेतले. मात्र, त्यांनी मध्यस्थी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुकानदारांनी आपले साहित्य बाहेर काढले. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या जेसीबीव्दारे तिन्ही दुकाने तोडण्यात आली. यावेळी एका दुकानदाराने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी हुज्जत देखील घातली. मात्र, या वादाला भीक न घालता मनपाकडून बी.जे.मार्केट परिसरातील इतर अतिक्रमणांवर देखील कारवाई केली. बी.जे.मार्केटलगत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली.

Web Title: JCB went to the grocery stores under the name 'Neki Ki Diwar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.