अनधिकृत धार्मिक स्थळांवर चालणार जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:24+5:302021-02-06T04:28:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील काही मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर विनापरवानगी वादग्रस्त अतिक्रमणे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ख्वॉजामिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काही मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर विनापरवानगी वादग्रस्त अतिक्रमणे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ख्वॉजामिया चौकातील एक अतिक्रमण गेल्या महिन्यात तोडण्यात आले. आता शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृत पद्धतीने बांधकाम केलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण मनपा प्रशासनाकडून काढण्यात येणार असून, याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला एक महिन्याचा आत सर्व अतिक्रमणे तोडण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे व नगररचना विभागाचे अभियंता समीर बोरोले यांनी शहरातील प्रमुख अतिक्रमणांची पाहणी केली. मुख्य रस्त्यालगत असलेल्या धार्मिक स्थळांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. यामुळे आता मनपाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांना टार्गेट केले असून, महिनाभरात ही कारवाई होणार आहे. तसेच सर्व अतिक्रमणाच्या विश्वस्तांना आणि प्रमुख धर्मगुरूंना विश्वासात घेत, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे आणि गठीत केलेल्या समितीच्या निर्देशांचे पालन करून कोणतीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही हे लक्षात घेऊन ही वादग्रस्त अतिक्रमणे हटविण्यात यावीत, असे पत्रदेखील महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिले आहे.
शहरातील अतिक्रमणांची केली पाहणी
रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वादग्रस्त अतिक्रमणांबाबत महापौरांनी अतिक्रमणांची पाहणी केली. अनेक धार्मिक स्थळे रस्त्याचा १० ते १२ फुटांपर्यंत मध्ये आली आहेत. तर काही अतिक्रमणे थेट रस्त्याच्या मधोमध आहेत. ही अतिक्रमणे काढली तर रस्ता मोकळा होणार असून, यामुळे वाहतुकीला नेहमी निर्माण होणारी समस्या मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. दाणा बाजार, ममुराबाद रस्ता, जुने बी.जे. मार्केटसह शहरातील इतर भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
महापौरांनी घेतली बैठक
ही अतिक्रमणे काढताना कोणताही वाद होऊ नये तसेच कोणत्याही परंपरेला धक्का पोहोचू नये म्हणून सर्व समाजातील प्रमुखांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. याबाबत महापौरांच्या दालनात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत बैठकदेखील घेण्यात आली. या बैठकीत महापौर भारती सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, गणेश सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते. याबाबत काही बैठका घेण्यात येणार असून, महिनाभरातच हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली.