भूल दिनानिमित्त जळगावात सोमवारी ‘जीवन संजीवन प्रात्यक्षिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:40 PM2017-10-15T22:40:19+5:302017-10-15T22:50:02+5:30
आगळ्य़ा-वेगळ्य़ा पद्धतीने साजरा करणार दिन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15- जागतिक भूल दिनानिमित्त इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट (आयएसए) शाखेतर्फे 16 रोजी भाऊंचे उद्यान येथे सकाळी 7 वाजता ‘जीवन संजीवन प्रात्यक्षिक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात रविवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी आयएसए संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सचिव डॉ. लीना पाटील, डॉ. अभिनय हरणखेडकर, डॉ. अश्विनी टेणी, डॉ. धीरज चौधरी आदी उपस्थित होते.
आगळ्य़ा-वेगळ्य़ा पद्धतीने साजरा करणार दिन
16 ऑक्टोबर जागतिक भूलदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा यानिमित्त सामान्यांना उपयोगी पडेल व जीवदान ठरू शकेल, असा उपक्रम राबविण्याचा निश्चय इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट शाखेने केला. त्यानुसार जिल्ह्यात प्रथमच जीवन संजीवनी प्रात्यक्षिक हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
काय आहे जीवन संजीवनी
अचानकपणे कोणी कोठेही कोसळले आणि त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले तर अशा व्यक्तीला पहिल्या पाच मिनिटात मदत मिळणे गरजेचे असते. यासाठी त्याला त्याच वेळी प्राथमिक उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळू शकते. यालाच जीवन संजीवन असे संबोधले जाते. या विषयीचे प्रात्यक्षिक 16 रोजी सादर करण्यात येऊन या जीवन संजीवनी क्रियेबद्दल डॉक्टरांमार्फत माहिती दिली जाईल व जनजागृती करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अवयवदानाविषयी करणार जनजागृती
समाजात अवयवदानाचे महत्त्व वाढावे व त्या विषयी जनजागृती व्हावी, या संदर्भात इंडियन सोसायटी ऑफ क्रीटिकल केअर मेडिसीन व इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट (आयएसए) यांची बैठक झाली. वर्षभर राबविण्यात येणा:या समाजोपयोगी उपक्रमाचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये अववयदानाची प्रथम डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून त्यानंतर नागरिकांर्पयत हा संदेश पोहचविला जाणार आहे. या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आयएमएचे सचिव डॉ. राजेश पाटील, डॉ. राजेश डाबी, डॉ. अरुण पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. संजय उंबरकर आदी उपस्थित होते.