घरातील तिजोरीतून साडेपाच लाखांचे दागिने चोरी; कुटूंबियांचा मोलकरणीवर संशय
By सागर दुबे | Published: April 17, 2023 12:24 PM2023-04-17T12:24:24+5:302023-04-17T12:25:39+5:30
चोरट्यांचा धुमाकूळ, रात्री नव्हे ; दिवसाही होतायेत घरफोड्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील राजमालती नगरातील सुनिता नरेंद्र मोरे यांच्या घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या डब्यातून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, घरात धुणी-भांडी करणा-या महिलेने हे दागिने लांबविले असल्याचा संशय मोरे कुटूंबियांना असून त्यांनी तिच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राजमालती नगरमधील सुनीता मोरे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती आजारी असल्यामुळे ते रेल्वेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी मुलगा हिमांशू हा रेल्वेत नोकरीला लागला आहे. पतीच्या पगारातून शिल्लक राहणाऱ्या पैशातून सुनीता मोरे यांनी बऱ्यापैकी सोन्याचे दागिने केले होते. बचतीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने त्या कपाटातील तिजोरीत पितळी डब्यात सुरक्षित ठेवत होत्या. मात्र, १ एप्रिलला त्यांची मुलगी सायली ही कपाटातील दागिने पहायला गेली, असता तिला डब्यामध्ये दागिने दिसून आले नाही. ही बाब तिने तत्काळ आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वतः सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १५ दिवस विचारपूस करूनही यश आले नाही.
मोलकरणीवर संशय, पोलिसात दिली तक्रार...
सुनीता मोरे यांच्याकडे साधारण तीन महिन्यांपासून धुणी-भांडी आणि घर स्वच्छतेसाठी एक महिला कामाला आहे. घरातील इंत्यभूत माहिती मोलकरणीला असल्याने मोरे कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र, तिने नकार दिला. अखेर रविवारी मोरे कुटूंबियांनी मोलकरणीविरूध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीला गेलेला असा आहे ऐवज
चार लाख रुपयांचे १० तोळ्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे एक तोळ्याचे कानातील टोंगल, १२ हजार रुपयांचे तीन ग्रॅमचे टॉप्स, ८० हजार रुपयांच्या ६ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण पाच लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"