दागिनेच काय, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर अन् सुटकेसही लांबवली; आयोध्या नगरात घरफोडी
By विजय.सैतवाल | Published: September 9, 2023 04:32 PM2023-09-09T16:32:30+5:302023-09-09T16:35:20+5:30
एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लांबविला
जळगाव : आयोध्या नगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह स्मार्ट टीव्ही, होमथिअटर, व दोन सुटकेस असा एकूण एक लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुनी एमआयडीसी परिसरामधील आयोध्या नगरमधील रहिवासी रवीराज राजेंद्र निकम (३५) हे बाहेर गावी गेलेले होते. त्या वेळी चोरट्यांनी १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून ७५ हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चैन, ३० हजार रुपये किमतीची सोनपोत, २० हजार रुपये किमतीचा स्मार्ट टीव्ही, आठ हजार रुपये किमतीचा होम थिअटर, एक हजार रुपये किमतीच्या दोन सुटकेस असा एकूण एक लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
घरमालक निकम हे घरी आले त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. त्या वेळी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत.