शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या झारखंडच्या तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:51+5:302021-01-03T04:17:51+5:30
नितीन आनंदराव निकम यांना २४ जुलै २०१९ रोजी इंडिया बुल धनी लोन या बँकेतून मॅनेजर बोलत असून आमची बँक ...
नितीन आनंदराव निकम यांना २४ जुलै २०१९ रोजी इंडिया बुल धनी लोन या बँकेतून मॅनेजर बोलत असून आमची बँक कमी व्याजदराने कर्ज देते असे सांगून अनोळखी व्यक्तीने निकम यांचा विश्वास संपादन करुन त्यांना 3 लाख रुपये कमी व्याज दराने देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार निकम यांच्या पत्नीचे आधारकार्ड तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम कार्डचा फोटो व्हॉटस्अॅपव्दारे मागवून घेतला. यानंतर अनोळखी व्यक्तीने निकम यांना सात दिवस वारंवार संपर्क साधला. तसेच ओटोपी क्रमांक मिळवून निकम यांच्या खात्यातून १ लाख ५९ हजार ७०१ रुपये ऑनलाईन काढून घेतले. याप्रकरणी ३ ऑगस्ट २०१९ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
झारखंडमधील अतिदुर्गम भागातून संशयितास अटक
तपासात झारखंड येथील संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण पाटील, दिलीप चिंचोले, ललीत नारखेडे, अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील यांचे पथक ३१ डिसेंबर रोजी झारखंडा राज्यात रवाना केले. पथकाने अतिदुर्गम भागात असलेल्या जमताडा येथून संशयित मजहर अन्सारी यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून फसवणूकीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल, एटीएमकार्ड, पॉस मशीनही हस्तगत केले आहे. त्या ताब्यात घेतल्यावर १ जानेवारी रोजी पथक जळगावात परतले. संशयित मजहर यास न्यायालयात हजर केले असता त्यास ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.