सात महिन्यांपासून चकवा देणाऱ्या जितेंद्र कंडारेच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:17+5:302021-06-29T04:13:17+5:30
बीएचआर घोटाळा : इंदूर येथून केली अटक जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात सात महिन्यांपासून पोलिसांना ...
बीएचआर घोटाळा : इंदूर येथून केली अटक
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या जितेंद्र गुलाबराव कंडारे ( रा. शिवाजी नगर, जळगाव) याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री नऊ वाजता मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. मंगळवारी पथक पुण्यात पोहोचणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २६ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांनी जळगावात धाडसत्र राबविले, मात्र तत्पूर्वीच अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर फरार झाले होते. या सात महिन्याच्या काळात त्यांनी पुणे विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वेळोवेळी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. कंडारे व झंवर या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी राबवली होती. कंडारे हा इंदूर मध्ये नातेवाइकांकडे आल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने एक पथक इंदूरला रवाना केले. या पथकाने सोमवारी रात्री नऊ वाजता कंडारेच्या मुसक्या आवळल्या. हे पथक मंगळवारी पुण्यात पोहोचणार आहे. या गुन्ह्यातील कंडारे हा मुख्य सूत्रधार असून त्याचा साथीदार सुनील झंवर अद्यापही फरार आहे.
घोटाळ्याचा आकडा ६२ कोटींपर्यंत
गुन्हा दाखल झाला तेव्हा घोटाळ्याचा आकडा १७ लाखांचा होता. तपासात हा आकडा आता ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याच गुन्ह्यांत गेल्या पंधरवड्यात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, जयश्री मणियार, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे यांच्यासह बड्या ११ कर्जदारांना अटक झाली होती. हे सर्व संशयित पुणे कारागृहात आहेत.