आमदारांचा विरोधानंतरही सागर पार्कवर होणार जॉगिंग ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:51+5:302021-02-06T04:26:51+5:30
जॉगिंग ट्रॅकच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन : अनंत जोशींचे आंदोलन ठरले यशस्वी (फोटो आहे..) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
जॉगिंग ट्रॅकच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन : अनंत जोशींचे आंदोलन ठरले यशस्वी
(फोटो आहे..)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सागर पार्क मैदानावर हायमास्ट लॅम्प बसविणे आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सागर पार्कवर जॉगिंग ट्रॅकच्या कामाला आमदार सुरेश भोळे यांनी विरोध केला होता. तर या कामासाठी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी मनपात एकदिवसीय उपोषण केले होते. आमदार भोळे व शिवसेनेचे गटनेते यांच्यासाठी हा विषय प्रतिष्ठेचा झाला होता. अखेर अनंत जोशी यांच्या मागणीनुसार या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सागर पार्क मैदानाच्या सुशोभिकरणासाठी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून सागर पार्कला संरक्षक जाळी बसविण्याचे काम यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते; मात्र जॉगिंग ट्रॅकचे काम थांबले होते. या मैदानावर अनेक युवक क्रिकेट खेळत असल्याने जॉगिंग ट्रॅक करण्यात येऊ नये, अशी मागणी युवकांची होती. याच मागणीनुसार आमदार भोळे यांनीदेखील सागर पार्कच्या मैदानावर जॉगिंग ट्रॅक करू नये, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे हे काम थांबले होते. अनंत जोशी यांनी या मैदानावर जॉगिंग ट्रॅक करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात मनपाच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. मनपा प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आले; मात्र तरीही या कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर महिनाभरानंतर या कामाला सुरुवात झाली आहे.
महापौरांच्या हस्ते झाले भूमिपूजन
गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते हायमास्ट लॅम्प बसविणे आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक अनंत जोशी आदी उपस्थित होते. मैदानावर जॉगिंग ट्रॅक तयार केल्यानंतर त्याठिकाणी वृक्षारोपणदेखील केले जाणार असून, त्यासाठी निधीदेखील मंजूर आहे, तसेच मैदानावर बीओटी तत्त्वावर स्वच्छतागृह उभारण्यासाठी सुप्रिम कंपनीसोबत चर्चा सुरू असून, लवकरच तो विषयदेखील मार्गी लागणार असल्याचे नगरसेवक अनंत जोशी यांनी सांगितले.