सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केली जळगाव जिल्हा रुग्णालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:00 PM2018-03-24T13:00:59+5:302018-03-24T13:00:59+5:30
बैठक घेऊन दिल्या सूचना
जळगाव : वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एससीआय) पथक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी २३ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या. या भेटीदरम्यान डॉ. लहाने यांनी चिंचोली येथील जागेचीही पाहणी केली.
जळगाव येथे सुरू होणाºया वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकेड हस्तांतरीत होऊन तेथे आवश्यक त्या तयारी सुरू आहेत. याची पाहणी करण्यासाठी यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एससीआय) पथक येऊन गेले. त्यानंतर त्यांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीदेखील दूर करण्याचे काम सुरू आहे.
आवश्यक निर्देशानुसार काम होत आहे की, याची पाहणी करण्यासाठी हे पथक पुन्हा येणार असून त्यासाठी जिल्हा रुग्णालयात लगबग सुरू आहे. या पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने यांनी येथे भेट देऊन जिल्हा रुग्णालयातील विविध कक्ष, बाह्य रुग्ण विभाग व इतर ठिकाणची पाहणी केली.
अधिकाºयांना दिल्या सूचना
पाहणी नंतर डॉ. लहाने यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधितांची बैठक घेतली. यामध्ये पथक येणार त्या वेळी सर्वांनी उपस्थित रहावे, त्यांना सहकार्य करावे, स्वच्छतेवर लक्ष द्या अशा विविध सूचना दिल्या.
जागेची पाहणी
चिंचोली येथील जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मिळाल्यानंतर आज डॉ. लहाने यांनी या जागेचीही पाहणी केली. या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील. अरविंद देशमुख, पीतांबर भावसार आदी उपस्थित होते.